प्रतिनिधी /लोहारा-एकल, परितक्ता, विधवा महिला व बचत गटासाठी दिनदयाळ उपाध्य योजने अंतर्गत व उमेद प्रकल्पच्या वतीने २६० विविध कोर्सेसचे विनामुल्य प्रशिक्षण दिले जाते. महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी केले. ते बुधवारी (दि. १९) लोहारा येथे आयोजित एकल महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते. उस्‍मानाबाद जिल्‍हा शेतकरी आत्‍महत्‍याग्रस्‍त असल्‍याने आत्‍महत्‍याग्रस्त कुटुंबांचे मनोबल वाढविण्‍यासाठी व त्‍यांना आर्थिकदृष्‍टया सक्षम करण्‍यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या निर्देशानुसार लोहारा तहसील कार्यालय व हॅलो मेडिकल फाऊंडेशन अणदुर यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालयाच्या सभागृहात तालुक्यातील एकल महिलांचा मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले हे होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन तहसीलदार विजय अवधाने, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे रमाकांत जोशी, नायब तहसीलदार रणजित शिराळकर, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, सहाय्यक निबंधक आर. व्हि. लोमटे, महावितरणचे आर. डी. चिगुरे, जिल्हा उद्योग केंद्राचे परसिंह जावळीकर, युनियन बँकेचे मनोहर जगदाळे उपस्थित होते. यावेळी सर्व खात्यातील अधिकाऱ्यांनी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची महिलांना सविस्तर माहिती देऊन या सर्व योजनांचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार विजय अवधाने यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे समन्वयक सतिश कदम यांनी तर वासंती मुळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकांत कुलकर्णी, ज्ञानेश्वर जाधव, विश्वंभर शहापुरे, संग्राम पाटील, अविनाश पवार, बालाजी चव्हाण, यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचारी व हॅलो मेडिकल फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. 
मेळाव्यात तालुक्यातील एकल महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली 
५०० महिलांची मेळाव्यास हजेरी या मेळाव्यात तालुक्यातून जवळपास ५०० महिला उपस्थित होत्या. त्यापैकी १४५ महिलांनी संजय गांधी निराधार योजनेसाठी, ४५ महिलांनी रेशनकार्डसाठी, लघु उद्योगासाठी ४२ तर घरकुलासाठी १२८ महिलांनी अर्ज सादर केले. या अर्जाच्या पूर्ततेसाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा होऊन त्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे. तरच या मेळाव्याच्या आयोजनाचे सार्थक झाले असे म्हणता येईल. 



 
Top