उस्मानाबाद/प्रतिनिधी-यंदा भयावह पाणी टंचाई असल्यामुळे सर्वांनाच या टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पाणी उपलब्ध करण्यासाठी सर्वत्र धावपळ होताना दिसत आहे. जिल्हा रूग्णालय व महिला रूग्णालयातील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे नातेवाईकांना नाईलाजास्तव विकतचे पाणी आणावे लागत होते. ही बाब लक्षात येताच जिल्हा रूग्ण कल्याण समितीचे सदस्य अब्दुल लतिफ यांनी जारचे पाणी उपलब्ध करून दिले. त्यामुळे रूग्णांची व नातेवाईकांची तहान तर भागवलीच शिवाय त्यांना दिलासा देखील मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यामुळे अब्दुल लतिफ यांचे कार्य प्रेरणादायी असून, अशाच प्रकारचे काम इतरांनीही करावे असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चंचला बोडके यांनी केले. येथील जिल्हा रूग्णालयातील नेत्र विभागात अब्दुल लतिफ यांनी जारचे थंड व स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले. यावेळी पाणीदाते जलराम क्लॉथ सेंटरच्या प्रतिनिधींचा अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बोडके व पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अब्दुल लतिफ, नेत्रतज्ञ डॉ. विरभद्र कोटलवाड, डॉ. आर. ए. सय्यद, डॉ. गजानन शेट्टे, समाजसवेक गणेश वाघमारे, संजय गजधने, परिचारिका एस. पी. गोरे, सरस्वती बागडे, आर. व्ही. लोंढे, अंकुश पाटील, लक्ष्मण दणाणे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. बोडके म्हणाल्या की, अब्दुल लतिफ त्यांच्या सहकार्यांनी पिण्याचे पाणी उपलब्ध करून पाणीदात्यांना आवाहन केले. त्या आवाहनास प्रतिसाद मिळाल्याने जिल्हा रूग्णालय व महिला रूग्णालयातील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पाणी उपलब्ध झाले. खर्या अर्थाने असे प्रेरणादायी काम प्रत्येकांनी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अब्दुल लतिफ व मल्लिकार्जुन सोनवणे यांनी आपले विचार व्यक्त केले.