उस्मानाबाद/प्रतिनिधी-डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापाठाच्या उस्मानाबाद उपपरिसर विकासासाठी आपण कटीबध्द असून येत्या आर्थिक वर्षात तरतुद केलेली सर्व विकास कामे लवकरच सुरु करण्यात येतील, अशी ग्वाही कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे यांनी दिली.विद्यापीठ उपपरिसराचा गुणात्मक विकास व्हावा म्हणून विद्यापीठ उपपरिसर मंडळाच्या सन्माननीय सदस्या सोबत चर्चा करुन धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी (दि.सात) बैठक घेण्यात आली.व्यवस्थापन परिषद कक्ष येथे मा.कुलगुरु यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. उस्मानाबाद उपपरिसरात चालू आर्थिक वर्षासाठी (२०१९-२०२०) १४ कोटी ८७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातील विकास कामांचा आढावा डॉ शिंदे यांनी घेतला. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर, डॉ.जयसिंग देशमुख, डॉ.अशोक मोहेकर, डॉ.गोविंद काळे, प्रा.संभाजी भोसले, नितीन बागल, संचालक डॉ.अनार साळुंके, उपकुलसचिव आय.आर.मंझा आदींची उपस्थिती होती. या बैठकीत अर्थसंकल्प २०१९-२० मध्ये करण्यात आलेल्या तरतूदीनूसार उपपरिसराचा शैक्षणिक व गुणात्मक विकास, विज्ञान भवन इमारतीचा पहिला मजला बांधणे, अतिथी गृह, सरंक्षण भिंत बांधणे, नवीन विभागासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे पदे निर्मिती करणे, मुलांचे वसतिगृह, उपहारगृह, क्रिडागंण, मुल्यांकन भवन व गोडाऊन व्यवस्थापनशास्त्र विभागाची स्वतंत्र इमारत, जल व भूमी व्यवस्थापन विभागासाठी जल व मृदा प्रयोगशाळा तयार करणे, नगर पालिकेमार्फत किमान ३ इंच मुख्य जलकुंभातून पाणी पुरवठा बाबत मागणी करणे, उपपरिसरातील तलावाचे खोलीकरण करणे, अंतर्गत रस्ते तयार करणे, नवीन विभागासह ज्या विभागासाठी प्रवेश पुर्व परिक्षेबाबत नोंदणी झालेली नाही त्यासाठी मुदतवाढ करणे आदी निर्णय घेण्यात आले. तसेच नवीन विभागासाठी नियुक्त करण्यात आलेले प्रभारी विभागप्रमुखांसाठी दालन, मुलींचे वसतिगृह व विज्ञान भवन इमारतीसाठी ५० के.व्ही.चे विद्युत जनित्र जनरेटर खरेदी, उपपरिसरामध्ये सोलार पथदिवे लावणे तसेच एम.आय.डी.सी प्राधिकरण विद्यापीठाकडून प्रति माह आकारत असलेले अनाधिकृत शुल्क रुपये ७५ हजार भरणा बदं करणेबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करणे इत्यादी व तत्सम विषयावर चर्चा करुन धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रस्तुत बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘आय क्वॅक‘ तर्फे नॅक मुल्यांकनात सहभागी प्राध्यापकांचा गौरव करण्यात आला. संचालक डॉ सुयोग्य अमृतराव यांच्यावतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.