उस्मानाबाद / प्रतिनिधी -
 उस्मानाबाद जिल्हयातील कौडगाव येथील औद्योगिक वसाहतीच्या ११८ हेक्टर जागेमध्ये २२५ कोटी रुपये खर्चाच्या ५० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीच्या कामास लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.
उस्मानाबाद जिल्हा हा सौर उर्जेकरीता अनुकूल असून उस्मानाबाद तालुक्यातील कौडगाव औद्योगिक वसाहतीच्या जागेतील प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामासाठीच्या निविदा प्रक्रिया व तांत्रिक बाबींची शासन व महाजनको स्तरावर पुर्तता झाली असून आज दि.२७ मे रोजी भेलच्या महाव्यवस्थापिका श्रीमती राव व अतिरिक्त महाव्यवस्थापक श्री स्वामी यांनी कौडगाव येथील औद्योगिक वसाहतीतील जागेची तसेच परिसरातील महावितरणच्या ३३ के.व्ही. उपकेंद्राची पाहणी केली. तत्पूर्वी उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृह येथे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी भेल व महाजनकोच्या अधिकाऱ्यां समवेत चर्चा करून या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम लवकर सुरु होऊन पूर्ण होण्याकरीता शासन व स्थानिक स्तरावर पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्र.का.सदस्य अँड खंडेराव चौरे, जिल्हा उपाध्यक्ष अँड नितीन भोसले हे उपस्थित होते.
यापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील अन्य प्रकल्पाप्रमाणेच मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचेही स्वप्न दाखविण्यात आले.मात्र मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या काळात ते स्वप्न सत्यात उतरत आहे याचा आनंद असून आम्ही जिल्ह्याच्या विकासाकरीता मोठ्या घोषणा व स्वप्न दाखविणार नाही तर स्वप्न सत्यात उतरविणार आहोत,असे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी म्हटले आहे. याबद्दल भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस,ऊर्जा व नविनीकरण ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व उद्योग व पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील यांचे आभार मानले आहेत. . 
 
Top