प्रतिनिधी / तुळजापूर-
रस्त्यावर गर्दी का केली म्हणून विचारणा करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाला युवा सेनेच्या तुळजापूर तालुका प्रमुखाने धक्काबुक्की करून चॉपरसारख्या शस्त्राने मारहाण करून जखमी केले. ही खळबळजनक घटना सोमवारी (दि.२७) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तुळजापूर शहरातील एसटी काॅलनी परिसरात घडली. या प्रकरणी युवा सेनेच्या तालुका प्रमुखासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, घटनेनंतर पोलिस ठाण्याच्या परिसरात मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता.
तुळजापूर शहरातील एसटी काॅलनी परिसरात अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या लेडीज हॉस्टेलकडे जाणाऱ्या रस्त्यावर युवा सेना तालुकाप्रमुख प्रतिक राेचकरी यांच्यासह तरुणांचा घोळका उभारलेला होता. यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिस उपनिरीक्षक गणेश झिंझुरडे व अन्य एका वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याने हटकले. यामुळे तरुणांच्या घोळक्यात व झिंझुरडे यांच्यात बाचाबाची होऊन उपनिरीक्षकांना मारहाण करण्यात आली. यामध्ये झिंझुरडेंच्या हातावर, छातीवर चाॅपर सारख्या धारधार शस्त्राने वार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी युवा सेनेचा तालुका प्रमुख प्रतिक रोचकरी याच्यासह अन्य दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर पोलिस ठाण्याच्या परिसरात मोठा जमाव गोळा झाल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र, तातडीने तामलवाडी येथून पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप घुगे यांनी परीस्थिती नियंत्रणात आली. 
 
Top