प्रतिनिधी /लोहारा-
तालुक्यातील जेवळी येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. ८) सहवाद्य बसवेश्वरांची प्रतिमा, नंदीध्वज, पालखीसह मिरवणूक काढून मंदीरासमोरील मैदानात अग्नीस्पर्शाचा कार्यक्रम पार पडला. अग्नीस्पर्श कार्यक्रमात भाविक निखाऱ्यावरून चालले. येथे दरवर्षी तीन दिवसीय यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येतो. या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. ८) सकाळी नऊ वाजता मानाचे नंदीध्वज, बसवेश्वरांची प्रतिमा ठेवलेल्या पालखीची मिरवणूक विविध कलापथक व वाद्यांच्या गजरात स्वामी गल्लीतून सुरू झाली. या मिरवणूकीत परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावातील बहुतांश घरासमोर रांगोळी रेखाटण्यात आली होती. गावकऱ्यांनी ठिकठिकाणी या मिरवणुकीचे स्वागत पारंपरिक पध्दतीने केले. मिरवणूक पुढे मल्लिकार्जुन मंदिर, सरस्वती गल्ली, मारुती गल्ली, बाजार पेठ, शिक्षक काँलनी सह गावातील मुख्य मार्गाने मंदिर परिसरात पोहोचली. यानंतर सकाळी ११.३० च्या सुमारास मंदिरसमोरील मैदानातील अग्नीकट्ट्यावर हृदयाचे ठोके चुकविणारा अग्निस्पर्श कार्यक्रम पार पडला. मानांच्या नंदीध्वज, पालखी, हजारो भाविक भक्त पेटत्या निखाऱ्यावरुन पायी चालत जाऊन मनात निर्माण झालेले षड््विकार जाळुन टाकले. यासाठी मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी एक वाजता भरड्याचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन यात्रा समितीचे उपाध्यक्ष बाबुराव हावळे यांच्या हस्ते झाले. यात्रेत लेबर कोर्टाचे न्यायाधीश गुलाबराव हुलसूरे, नंदकुमार कुलकर्णी यांनी प्रसाद तर यात्रा काळात येणाऱ्या भाविकांना येथील शिवकृपा परिवाराचे शामसुंदर तोरकडे, तसेच जगदीश डिग्गे व सत्तेश्वर ढोबळे यांच्या कडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत, वृत्तपत्र विक्रेता शिवानंद कारभारी, श्रीशैल काराळे, विलास हावळे, बसव प्रतिष्ठान व मोरया गणेश मंडळाने जारची सोय केली. |