प्रतिनिधी/उस्मानाबाद -
चुलत बंधूमध्ये लढत झालेल्या आणि संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत अखेर शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी बाजी मारत राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा दारूण पराभव केला. ओमराजेंनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राणा पाटलांकडून झालेल्या पराभवाचा बदला घेत ही निवडणूक जिंकली. दरम्यान या निवडणुकीत सेनेपेक्षा भाजपची एकूणच यंत्रणा सेनेसाठी फायद्याची ठरली. मोदींची सुप्त लाट आणि बुथ कमिट्यांपर्यंत भाजपने केलेले नियोजन सेनेसाठी मोलाचे ठरले. त्यामुळेच मोदी लाटेपुढे सेनेच्या उमेदवाराची कथित व्हिडीओ क्लिप किंवा प्रा. गायकवाडांची नाराजीची भूमिका, असे कुठलेही मुद्दे फारसे प्रभावी ठरले नाहीत.
सकाळी साधारण ८.३० वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. पहिल्याच फेरीत सेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजितसिंह यांच्यावर जवळपास सहा हजारांची लीड घेतली. पहिल्या फेरीपासून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून सेनेला मिळत गेलेली आघाडी अखेरच्या फेरीपर्यंत कमी अधिक फरकाने कायम होती. वाढत चाललेली लीड पाहता दुपारनंतर राष्ट्रवादीच्या प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रातून बाहेर पडण्यास प्रारंभ केला. दुसरीकडे वाढत्या लीडबरोबर महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते केंद्राच्या परिसरात जमू लागले. अखेर ओमराजे यांचा १ लाख २७,५६६ मताधिक्याने विजय झाल्याचे स्पष्ट होताच केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची फटाके फोडून तसेच गुलाल उधळून आंनदोत्सव साजरा केला. सायंकाळी ओमराजेंची महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह मिरवणूक काढण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांनी गुलाबाचा मोठा हार क्रेन लाऊन ओमराजेंच्या गळ्यात घातला. या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान उमेदवार ओमराजे निंबाळकर, सेनेचे सहसंपर्कप्रमुख शंकरराव बोरकर, सेनेचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, प्रतापसिंह पाटील, अॅड. नितीन काळे आदी प्रत्येक आकडेवारीचा तपशील घेऊन बेरजेचे गणित मांडत होते. 
 
Top