उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी शाश्वत पाण्याचा स्रोत असलेल्या उजनी धरणातून पाणीपुरवठा योजना राबवली गेली आहे. २०१३ साली आतापेक्षा जास्त गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना, अंतर्गत जलवाहिनी व वाढीव क्षमतेच्या जलकुंभांची कामे पूर्ण झालेली नसताना, आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करून नागरिकांना ४ दिवसाला पाणी दिले जात होते.
योजनेच काम तीन टप्प्यात पूर्ण करून शहराला २४ x ७ पाणी देण्याचे नियोजित होते. पहिल्या टप्प्यात ८ एम.एल.डी क्षमतेची योजना कार्यान्वित करून अंतर्गत जलवाहिनीची कामे पूर्ण करणे, दुसऱ्या टप्प्यात योजनेची क्षमता ८ वरून १६ एम.एल.डी. करणे व तिसऱ्या टप्प्यात म्हणजे आताच्या कालावधीत शहराला २४ तास पाणीपुरवठा सुरू करणे नियोजित होते. २०१६ नंतर ज्या गतीने योजनेचे काम व्हायला हवं होतं त्यानुसार झालं असत तर आज रोजी शहराला दैनंदिन २४ तास पाणी देता आलं असत.
परंतु नगराध्यक्ष राजेनिंबाळकर व मुख्याधिकाऱ्यांच्या अकार्यक्षम कारभारामुळे योजनेचे पुढील काम संथ गतीने चालले व अंतर्गत जलवाहिनीची कामे अजून पूर्ण झाली नाहीत. २०१६ साली मंजूर झालेली क्षमता वाढीचे काम देखील अपेक्षित वेगाने झाले नाही. जलवाहिणीला लागलेली गळती रोखण्यासाठी देखील कसलीच उपाययोजना केली नसल्याने पाणी उपसा वाढत असला तरी त्याप्रमाणात शहरात पाणी पोहचत नाही. उस्मानाबाद शहराची लोकसंख्या १.३० लाख गृहित धरली तर दररोज ८ एमएलडी पाणी लागते, पण पालिकेला पाणी गळती थांबवण्यात आलेले अपयशामुळे उजनी धरणात मुबलक पाणी असताना देखील शहरवासीयांना पंधरा ते वीस दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत आहे. पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च केले तरीही शहराच्या पाण्याची घडी नीट बसलेली नाही. याला नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा हलगर्जीपणा व गलथान कारभार कारणीभूत आहे.
शहरासाठी येणाऱ्या ८ एमएलडी पाण्याचा हिशोब लागत नसल्याने नेमकी काय अडचण आहे हे जाणून घेण्यासाठी आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सूचनेवरून राष्ट्रवादीचे गटनेते युवराज नळे, नगरसेवक माणिक बनसोडे, अभय इंगळे व गणेश खोचरे यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये सलग दोन दिवस उस्मानाबाद पासून उजनी धरणापर्यंत पाणी योजनेच्या जलवाहिनीची प्रत्यक्षात पाहणी केली असता अनेक धक्का दायक बाबी समोर आल्या होत्या. उस्मानाबाद ते उजनी धरण या दरम्यान योजनेवर जेथे व्हॉल्व आहेत अशा २० ठिकाणी दररोज २४ तास गळती होत असून पाण्याची प्रचंड नासाडी होते असल्याचे दिसून आले होते. त्यातील ८ ठिकाणी जवळपास दोन इंचाहून अधिक प्रमाणात उच्चदाबाने पाणी गळती असल्याचे निदर्शनास आले होते. बार्शी तालुक्यात सौंदरे ते कासारवाडी दरम्यान एका ठिकाणी जलवाहिनीला इतकी मोठी गळती होती की त्या शेजारी असलेला नाला पूर्णतः भरून वाहत होता. पंप हाऊस च्या ठिकाणी असलेले पाण्याची मोजदाद करणारे फ्लोमिटर दोन वर्षांपासून बंद असल्याचे लक्षात आले. याबाबत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना अवगत केले होते. त्यावर त्यांनी कोणतीच कार्यवाही केली नाही.
योजनेची क्षमता वाढ झाल्याने आता पाण्याचा उपसा वाढेल व टंचाई जाणवणार नाही असं नुकतंच नगराध्यक्षानी पत्रपरिषदेत माहिती दिली आहे. मात्र गळती रोखण्याबाबत कसलीच उपाययोजना केलेली नसल्याने उजनी पाणीपुरवठा योजनेची पंपिंग क्षमता वाढली तरी योग्य प्रमाणात पाणी येऊच शकणार नाही. पाणी किती येते याची मोजदाद करण्यासाठी वापरण्यात येणारे फ्लोमिटर बंद असल्याने प्रत्यक्षात किती पाण्याचा उपसा होतो व गळती किती होते हेच समजत नाही. कदाचित हे लक्षात येऊ नये म्हणूनच गेली दोन वर्षांपासून फ्लोमिटर चालू करण्याची आमची मागणी असताना ते दुरुस्त केले जात नसावे. उजनी धरणात मुबलक पाणी असताना उस्मानाबाद शहरातील नागरिकांना पाणी वेळेवर का दिले जात नाही याची शहानिशा व्हावी यासाठी आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना पुन्हा एकदा जलवाहिनीची पाहणी करून याबाबत असलेल्या अडचणी जाणून घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार दि.१/५/२०१९ रोजी नगरसेवक युवराज नळे, माणिक बनसोडे, अभय इंगळे, अभिजित काकडे, नाना घाटगे व संदीप साळुंखे यांनी प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली असता नोहेंबर २०१८ मध्ये असलेली परिस्थिती आजही कायम असल्याचे दिसून आले. त्यावेळी ज्या ठिकाणी गळती होत होती तिथेच आजही मोठ्या प्रमाणात गळती असल्याचे दिसून आले. आश्चर्याची बाब म्हणजे टेम्पर प्रूफ व्हॉल्व्ह जेथे बसवले आहेत अशा ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे दिसून आले.त्यामुळे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने व गळती रोखण्यासंदर्भात दाखवलेल्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. नुकतेच बसवलेले टेम्पर प्रूफ व्हॉल्व्हची जर गळती होत असेल तर नक्कीच यात कांही तरी काळंबेर असणार आहे. निकृष्ट दर्जाचे व्हॉल्व्ह तसेच अनुषंगिक साहित्य वापरले असेल तर याची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करणे योग्य राहील.उजनी धरणात मुबलक पाणी असताना नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे १५-२० दिवसातुन एकदा पाणी मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगर प्रशासनाला अनेक ठिकाणी नासाडी व गळती असल्याने पाणी मिळत नसल्यान गळती थांबवण्याबाबत वेळोवेळी सूचना दिलेल्या असताना त्यांनी गळती थांबविण्याबाबत अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांची योजना असूनही शहरवासीय तहानलेले आहेत. उस्मानाबाद शहरातील जनतेला नियमित व योग्य पाणी मिळावे यासाठी आ.राणाजगजीतसिंह पाटील साहेब व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आपणाला देखील पत्र देऊन व प्रत्यक्षात भेटून लक्ष घालून शहरवासीयांची अडचण दूर करावी व चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची विनंती केली होती.
तरी देखील याबाबत अद्याप कसलीच सुधारणा झालेली दिसून येत नाही. पाणी असताना प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराने नागरिकांना नाहक पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्यांना ५०० - १००० /- रुपये खर्चून पाणी विकत घ्यावे लागत आहे. जिल्ह्याच्या प्रशासकीय प्रमुख या नात्याने आपण याप्रश्नी लक्ष घालून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी उपाययोजना करावी तसेच ज्या घटकांनी याकामी कर्तव्यात कसूर केला आहे त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आज दिनांक ०६.०५.२०१९ रोजी उजनी धरणात मुबलक पाणी असताना नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराने उस्मानाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाई वर उपाययोजना करणे बाबत मा. जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांना कॉंग्रेस पार्टी व शहर वासीयांच्या वतीने निवेदन देवून करण्यात आली.
यावेळी माजी नगर अध्यक्ष दत्ता बंडगर, सरचिटणीस मसुदभाई शेख, गटनेते युवराज नळे, शहर अध्यक्ष अय्याज शेख, नगरसेवक प्रा. चंद्रजीत जाधव, कल्यान पवार, बाबा मुजावर, अभिजीत काकडे, सनी पवार, बापू पवार, दत्ता पेठे, अशोक पेठे, इस्माईल शेख, पांडुरंग लाटे, लक्षमन माने, कादर खाण, महादेव माळी, राजसिंह राजेनिंबाळकर, राज निकम,इलीयास पिरजादे, चंद्रकांत काकडे, सुजीत साळुंखे, नाना घाटगे, खलील पठान, विलास लोंढे, विलास पवार, दिनेश बंडगर, बिलाल तांबोळी, चंदन जाधव, अमोल राजेनिंबाळकर,अमोल सुरवसे, सय्यद यासिर, पंकज जाधव, सूरज शेरकर, अक्कू पठाण, शशिकांत कुराडे, इस्ला काझी, पुष्पकांत माळाले, रियाज शेख, चन्द्रशेखर सुरवसे, दत्ता वाघमारे, प्रशांत पवार,युवराज झोंबाडे, विशाल पवार, सुधीर आल्कुंटे, सय्यद मुज्जमिल, ज्ञनेश्वर निंबाळकर, बनसोडे यू., सरफराज कुरेशी, पठाण मजहर, सोमा शिंदे, रंजीत कानडे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व शहरवाशी मोठ्या संखेने उपस्थित होते.