उस्मानाबाद /प्रतिनिधी- अहिल्यादेवींनी मंदिरांसह मस्जिदींचा जीर्णोद्धार करत सामाजिक एकोपा जपण्याचे कार्य केले त्याचे मूर्तीमंत उदाहरण अंबड येथील मस्जिद असल्याचे प्रतिपादन अविनाश धायगुडे यांनी केले.
उस्मानाबाद शहरातील जत्रा जंक्शन हाॅलमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 294 व्या जयंतीचे औचित्य साधून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती उस्मानाबादच्या वतीने मंगळवार (दि.28) रोजी "भारतीय इतिहासात होळकरशाहीचे योगदान" या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर होते. या वेळी पंचायत समिती सभापती बालाजी गावडे, भाजपा नेते डाॅ.गोविंद कोकाटे, अॅड.खंडेराव चौरे, व्यापारी संघटनेचे सतिश घुले, समितीचे अध्यक्ष डाॅ.संजय सोनटक्के अॅड किरण चादरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना धायगुडे म्हणाले की, आज महाराष्ट्रात भिषण दुष्काळ असताना 18 व्या शतकात अहिल्यादेवींनी बांधलेल्या तुळजापूर, परळी,बीड शहरातील बारवांना आजही पाणी यातून अहिल्यादेवींचा पाण्याबाबतीत असलेला दूर दृष्टीकोन दिसून येतो. शिवरायांच्या स्वराज्याचा झेंडा अटकेपार लावणारे आणि मध्यप्रदेशात स्वराज्याची स्थापना करणारे मल्हारराव होळकर हे अहिल्यादेवीचे सासरे होते. त्यांनी प्रजेच्या हिताचे, सुख-शांतीचे राज्य निर्माण केले. राजाचा वारसपुत्र खंडेरावाचा लढाईत मृत्यू झाला. पुढे रुढी-परंपरेने सती जाण्याची वेळ अहिल्यादेवीवर आली. परंतु जनतेसाठी निर्माण केलेले राज्य पेशव्यांच्या हातात जाऊन प्रजेला त्रास होईल म्हणूनच पाखंडी धर्माच्या श्रृखंला तोडून अहिल्यादेवीला सती न जाऊ देता तिच्या हाती राज्यकारभार सोपविण्याचे काम मल्हाररावांनी त्यावेळी केले. अहिल्यादेवीने सती जाण्याचा रुढी-परंपरा तोडून, लोक निंदेला न जुमानता,आपण मेलो तर आपल्याला सुख मिळेल परंतु जगलो तर आपल्या लाखो प्रजाजनांना सुख मिळेल म्हणून सती न जाण्याचे ठरवून धर्माच्याविरुध्द क्रांतीकारी पहिले बंड केले. धर्माच्या नावाखाली भारतीय स्त्रीला शिक्षणाचा,राज्य करण्याचा अधिकार नव्हता. त्याविरुध्द क्रांतीकारी दुसरे बंड करुन अहिल्यादेवीने राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. कुटूंबातील सासरा, नवरा, मुलगा या सर्वांच्या मृत्यूननंतर जनकल्याणासाठी मनोधैर्य खचू न देता, धैर्याने अहिल्यादेवीनी राज्यकारभार सांभाळला. त्या जास्तीत-जास्त वेळ समाजकल्याणासाठी देत. अहिल्यादेवीनी प्रजेला त्रास देणा-यांना पकडून आणून सामोपचाराच्यात गोष्टी सांगून त्यांना जगण्यासाठी जमिनी देवून चांगल्या मार्गाला लावले. परंतु कालपरत्वे अहिल्यादेवीचे खरे कर्तुत्व हे समाजापुढे न आणता हातात पिंड घेतलेली स्त्री इतिहासाने व इतिहासकारांनी समाजापुढे उभी केली हे एक षडयंत्रच म्हणावे लागेल.कारण हातात तलवार घेतलेली अहिल्यादेवी दाखविली तर आम्ही राजा होऊन राज्यकारभार चालवू शकतो,क्रांती करु शकतो हा विचार व विश्वास बहुजन स्रीयांच्या मनात निर्माण होऊन अनेक अहिल्या उभ्या राहतील. तशा त्या लढवय्या समोर येऊ नयेत याची प्रकर्षाने काळजी तत्कालीन इतिहासकारांना व पेशव्यांना होती म्हणून त्यांनी अहिल्यादेवीचे चित्र तसे उभे केले. बहुजनांचे लोककल्यानकारी राज्य निर्माण करणाऱ्या अहिल्यादेवी आज आचरणात आणणे आज काळाची गरज आहे.यावर आज आपण विचार करायला हवा विचारातून परिवर्तन घडू शकते असे शेवटी ते म्हणाले.
प्रा.मनोज डोलारे, प्रा.शिवाजी गाढवे, लिंबराज डुकरे, सचिन कसपटे, प्रा.कपिल सोनटक्के, संदीप वाघमोडे, गणेश एडके, अॅड.मनिष वाघमारे, नितीन डुकरे, देवा काकडे,दिनेश होळकर, सुभाष सोनटक्के आदींनी पुढाकार घेवून कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी अॅड. विद्या वाघमारे, मानसी डोलारे, उषाताई लांडगे, मिना डोलारे उपस्थित होत्या सूत्रसंचालन प्रा.सोमनाथ लांडगे तर आभार डाॅ.संतोष पाटील यांनी मानले. शहर व परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.