काटी /प्रतिनिधी -
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे तालुक्यातील एकमेव चारा छावणी काटी-शेळगाव रस्त्यालगत येथील भवानी ग्रामविकास व संशोधन संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आली. 10 एप्रिल रोजी सुरू झालेल्या या चारा छावणीत काटीसह परिसरातील सावरगाव, केमवाडी, वडगाव, मसला, दहिवडी, शेळगाव, दारफळ, सावंतवाडी, वाणेवाडी, खुंटेवाडी, नरसिंह तांडा आदी गावांमधून 940 जनावरे दाखल झाली असून वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने दिवसेंदिवस चारा छावणीत पशुधनाच्या संख्येत वाढ होत आहे. या चारा छावणीमुळे जनावरांना चांगला आधार झाल्याने पशुपालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
आपले पशुधन वाचवण्याच्या पशुधनासोबत बाहेर गावाहुन आलेल्या पशुपालकांची जेवणाची सोय व्हावी या उद्देशाने भवानी ग्रामविकास व संशोधन संस्थेचे अध्यक्ष तथा चारा छावणी चालक अविनाश कोळी यांनी प्रयत्न करुन कल्याणचे आमदार श्री. नरेंद्र पवार यांच्या सौजन्याने रविवार दि. 19 रोजी चारा छावणीत मोफत झुणका भाकर केंद्र सुरू करण्यात आले आहे. चारा छावणी मध्ये पशुपालकांची अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने पशुपालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मागील आठवडय़ात पशुपालकांच्या मनोरंजनासाठी संस्थेच्या वतीने भारुडाचा कार्यक्रमही घेण्यात आला होता.
यावेळी छावणी चालक तथा भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अविनाश कोळी, सरपंच आदेश कोळी, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, प्रदीप साळुंके , सुजित हंगरगेकर, काकासाहेब रोडे, तानाजी चिवरे, सुनिल परीट अमोल कोळी, दत्तात्रय कोळी यांच्यासह पशुपालक शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
