प्रतिनिधी / उस्मानाबाद
ग्रामीण भागात शासनाच्या निकष्ाप्रमाणे पाणी मिळत नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर पालकसचिव अनिल डिग्गीकर यांनी ग्रामीण भागात अधिक प्रमाणात पाणी उपलब्ध करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
यासंदर्भात दिलेल्या पत्रकात नमुद करण्यात आल्यानुसार, जिल्ह्याचे पालक सचिव तथा पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार राहुल मोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांनी भेटून जिल्ह्यातील पाणीटंचाई व तीव्र दुष्काळी परिस्थितीबाबत त्यांना अवगत करून चर्चा केली. दुष्काळी परिस्थितीमध्ये शासन निकषाप्रमाणे जिल्ह्यातील एकाही गावाला पाणी पुरवठा करण्यात येत नाही ही बाब प्रामुख्याने त्यांच्या निदर्शनास आणून दिली. भारनियमन व अधिग्रहीत विंधन विहीरीचे कमी झालेले पाणी यामुळे टँकरला मंजूर केलेल्या खेपा पूर्ण होत नाहीत. तसेच अधिगृहीत विंधनविहीरीद्वारे ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळत नाही, याबाबी उदाहरणासह त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. उस्मानाबाद तालुक्यातील येडशी गावाचे उदाहरण आमदार पाटील यांनी यावेळी मांडले. येडशी गावाची लोकसंख्या १० हजार ३३५ आहे. आजची वाढीव लोकसंख्या पकडुन ११ हजार ९३९ धरली तर दरडोई २० लिटर प्रमाणे २ लाख ३८ हजार ७८० लिटर पाणी दर दिवशी अनुज्ञेय आहे. जनावरांसाठीही पाणी मिळणे आवश्यक असताना मुबलक पाणी मिळत नाही. अशीच परिस्थिती संपुर्ण जिल्हयात आहे. एकाही गावामध्ये नियमानुसार पाणी दिले जात नाही. तसेच टँकरच्या खेपा सुद्धा कमी होतात. यामुळे निकषाच्या अनुषंगाने प्रत्येक गावचे पाण्याचे मोजमाप केले जावे. आणि त्या अनुषंगाने अधिग्रहण अथवा टँकरच्या माध्यमातून पुरेसे पाणी तातडीने उपलब्ध व्हावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली, पालक सचिवांनी ती तात्काळ मान्य करत याप्रमाणे टँकर व अधिग्रहण प्रस्तावांना मंजूरी देण्याचे आदेशित केले. तसेच जनावरांच्या बाबतीत शासनाकडुन लेखी आदेश आलेले आहेत तरी देखील त्याचे पालन जिल्हयात होत नव्हते. त्याबाबत त्यांना कल्पना देण्यात आली, त्यावर शासन निर्णायप्रमाणे तातडीनेे कार्यवाही करण्याच्या सक्त सूचना पालक सचिव यांनी दिल्या आहेत. आता दुष्काळाने तीव्रता गाठली असून प्रशासनाने पालक सचिवांनी दिलेल्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करून दुष्काळाने होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.
लोडशेडिंग वेळ बदला, दिवसा पूर्णवेळ वीज द्या 
अधिग्रहीत बोअरवेल व टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी दिवसा लोड शेडींगमुळे अडचण निर्माण होत आहे. दिवसाचे लोड शेडींग बदलण्याच्या विषयावर दि.१५ मे रोजी मुख्यमंत्री यांच्या बैठकीत चर्चा झाली होती. तशा लोड शेडींग बदलण्याच्या सूचना मुख्यमंत्री यांच्याकडुन देण्यात आल्या होत्या. याबाबत प्रशासनाकडुन वीजभाराचे मोजमाप करण्याचे काम सुरू असुन येत्या २ ते ३ दिवसात दिवसाचे लोड शेडींग बंद करण्याची प्रक्रिया चालु होईल. त्यामुळे दिवसा पुरेसे पाणी टँकरद्वारे, अधिग्रहणाद्वारे नागरिकांना उपलब्ध होवू शकेल व जनतेला पाण्यासाठी रात्री अपरात्री होणाऱ्या त्रासापासुन दिलासा मिळेल अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी व्यक्त केली. 
 
Top