उस्मानाबाद /प्रतिनिधी-
पालिका प्रशासनाचे ढिसाळ नियोजन आणि नगराध्यक्षांचे बेजबाबदार वर्तन यामुळेच उस्मानाबाद शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. केवळ नियोजनाअभावी निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईमुळे उस्मानाबाद शहरात दरमाह सुमारे आठ कोटी रूपयांचा अनियंत्रित पाणीबाजार फोफावला आहे. यात तातडीने लक्ष घालून उस्मानाबादकरांच्या पाणीटंचाईचा प्रश्न निकाली काढून दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विभागीय आयु्नत सुनील केंद्रेकर यांच्याकडे केली आहे. शनिवारी आपण व्यक्तिशः उस्मानाबादला येवून याबाबत आढावा घेणार असल्याचे केंद्रेकर यांनी सांगितले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
उस्मानाबाद शहरात असलेल्या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याबाबत चर्चा करून जनतेला दिलासा मिळावा यासाठी आज राणा जगजीतसिंह पाटील यांनी उस्मानाबाद शहराचा ज्यांनी कारभार पहिला असे राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष सर्वश्री दत्ता बंडगर,सुनील काकडे,मैनोद्दीन पठाण,अमित शिंदे,माणिक बनसोडे,खलिफा कुरेशी,गटनेते युवराज नळे,शहराध्यक्ष अय्याज शेख यांच्यासोबत बैठक घेतली आजच्या टंचाईच्या काळात उपाय शोधण्यासाठी,पूर्वी दुष्काळी परिस्थितीत शहर पाणीपुरवठ्याबाबत जे नियोजन केले जात होते त्यावर सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत उजनी योजनेत पहिल्या टप्प्यात ८ एम एल डि पाणी आणणे,दुसऱ्या टप्प्यात विस्तार वाढ करत वाढीव ८ एम एल डी पाणी आणणे,अंतर्गत जलवाहिनीची कामे पूर्ण करणे व तिसऱ्या टप्प्यात २४ तास पाणी देणे नियोजित होते व आज योजनेचे पुढील काम संथ गतीने चालू असल्याने नियोजित वेळेत २४ तास पाणी देणे शक्य झाले नाही व याला विद्यमान नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा व ढिसाळ कारभार कारण असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी २०१२ साली जेंव्हा तीव्र दुष्काळी परिस्थिती होती तेंव्हा तेरणा व रुईभर प्रकल्पातील पाणी साठा संपल्या नंतर पुढील नियोजन करण्यासाठी माकणी धरणातून पाणी लिफ्ट करून वडाळा धरणात व तिथून पुढे रुईभर प्रकल्पात आणले व शहराला योग्य प्रमाणात नियमित पाणी देण्याबाबत नियोजन केले होते.पुढे २०१३ साली देखील दुष्काळ पडल्याने तेरणा व रुईभरचे पाणी संपल्या नंतर शिंगोली धरण,आंबेहोळ,बेडकी तलाव घाटंग्री व चोराखळी धरणातून टँकर द्वारे पाणी उचलून शहराला पाणी देण्याबाबत नियोजन केल्याची माहिती समोर आली.प्रसंगी खाजगी बोरवेल चे अधिग्रहन करून त्या त्या भागात पाणी दिले जायचे.
चर्चे दरम्यान विद्यमान नगराध्यक्षांनी जर याप्रमाणे तेरणा प्रकल्पातील पाणी साठा संपण्यापूर्वी जर शहारानजीक पाणी उपलब्ध असलेले स्रोत शोधून त्यातून टँकर चालू केले असते व खाजगी बोअरवेल चे अधिग्रहण करून पर्यायी व्यवस्था निर्माण केली असती तर शहरवासीयांना आज जी अभूतपूर्व टंचाईचा सामना करावा लागत आहे तो करावा लागला नसता.नागरिकांना जो नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे तो सोसावा लागला नसता.केवळ यांच्या बेजबाबदार वर्तन व अकार्यक्षम कारभारामुळे नागरिकांना त्रास होत आहे.
चर्चेदरम्यान शहरातील नागरिकांना आपल्या गरजा भागवण्यासाठी पाणी विकत घेण्यासाठी महिन्याकाठी जवळपास ८ कोटी रुपयांची झळ बसत असल्याची बाब समोर आली.गेल्या सहा महिन्यात नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे शहरवासीयांचे अंदाजे ५० कोटी रुपये केवळ पाणी विकत घेण्यासाठी खर्ची झाले आहेत.वारंवार गळती बाबत सूचना देऊन देखील ती थांबवण्यासाठी कांहीच केले नाही,आज ही ४८ ठिकाणी गळती होत आहे.पाणी उपसा किती झाला व प्रत्यक्षात किती पाणी आले याची माहिती होण्यासाठी असलेले फ्लो मीटर २ वर्षांपासून बंद आहेत,पाणी विक्री व्यवसायात शिवसेनेचे दोन बडे नेते असल्यानेच कदाचित नगराध्यक्ष जाणीवपूर्वक पाणीप्रश्नी चुप्पी साधून गप्प बसले असावे असा देखील सूर उमटला.
१३०००० लोकसंख्येच्या पाणी प्रश्नी नगरप्रशासन अजिबात गंभीर नसल्याचे पाहून आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी थेट कर्तव्यदक्ष व कडक अधिकारी म्हणून ख्याती असलेले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना दूरध्वनीवर संपर्क साधला व उस्मानाबाद शहराच्या पाणी प्रश्नी लक्ष घालून नागरिकांना दिलासा देण्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबत मागणी केली असता त्यांनी याची गांभीर्याने दखल येत्या शनिवारी आपण व्यक्तिशः उस्मानाबादला भेट देऊन याबाबत आढावा अशी माहिती दिली.
चर्चे अंती सर्वानुमते सध्याच्या परिस्थितीत परिस्थिती नियंत्रनात आणून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी तातडीने देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देऊन गळतीवर नियंत्रण आणणे, बोअर अधिग्रहण करणे व गरजेनुसार टँकर चालू करून पाणीपुरवठा सुरळीत करणे तर दीर्घकालीन उपाय योजना म्हणून वाढीव ८ एम एल डी पाणी आणण्याचे काम कालमर्यादा घालून युद्धपातळीवर पूर्ण करणे.नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी नगरपालिका प्रशासनाला या उपाययोजना सुचवून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या बाबी करायला भाग पाडण्याचे ठरले.
आता राज्यभर ख्याती असलेल्या एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने या प्रश्नी लक्ष घातल्याने पाण्याने व्याकुळ झालेल्या उस्मानाबाद शहरातील नागरिकांना निश्चित दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.