प्रतिनिधी /तेर-
दुष्काळात रोजच्या जगण्याची अडचण झाली असताना वयात आलेल्या मुलीच्या लग्नाची चिंता अशा द्विधा अवस्थेतील शेतकऱ्यांना तेर येथील छावणी चालकाने स्तुत्य उपक्रम राबवत दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचा विवाह सोहळा आयोजित करून हजारो वऱ्हाडींच्या साक्षीने बुधवारी (दि.२९) हा सोहळा पार पडला.
तेर येथे श्रध्दा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व आई प्रतिष्ठानच्या वतीने तेर येथील चारा छावणीत हजारो वऱ्हाडी मंडळीच्या साक्षीने छावणीतील दोन शेतकऱ्यांच्या मुला- मुलींचा विवाह सोहळा पार पडला. मराठवाड्यातील चारा छावणीत होणारा हा पहिलाच विवाह सोहळा होय.बुधवारी दुपारी १२.३६ वाजता दोन शेतकरी कुटुंबातील मुला मुलींच्या लग्नाच्या रेशीम गाठी बांधल्या गेल्या. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर,शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, अनिल काळे, छावणी चालक सतीशकुमार सोमाणी, नितीन शेरखाने, जिप सदस्य बाळासाहेब जाधवर, महादेव खटावकर, मुरुडचे हनुमंत नागटिळक, बी. एन. डोंगरे, संजय खडके, उस्मानाबादचे तहसीलदार विजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या तेर व भंडारवाडी येथील शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींचा विवाह चारा छावणीत लावून देण्यात आला. यामध्ये सोनाली जोतीराम एडके (भंडारवाडी) व ज्ञानेश्वर पारप्पा देवकर (कार्ला) यांचा व तेर येथील निकिता बाळू देडे व गणेश लहू गवळी (रा. कळंब) यांचा विवाहसोहळा छावणीत पार पडला. दुष्काळात दिलासा देण्यासाठी सोमाणी यांच्या वतीने चारा छावणीत वधू वरांच्या नातेवाईकांनी ठरविलेल्या तारखेलाच दि.२९ मे रोजी हा विवाह सोहळा पार पडला. 
 
Top