प्रतिनिधी /तुळजापूर-
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरी धरणात जूनअखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने शनिवारी म्हणजे १ जूनपासून तीर्थक्षेत्र तुळजापूरला दोन दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात शहरवासीयांसह भाविकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
नळदुर्ग येथील बोरी धरणात केवळ ०.३२ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. बोरी धरणातून तुळजापूरसह नळदुर्ग, अणदूर या मोठ्या गावांना पाणीपुरवठा होतो. हे पाणी काटकसरीने वापराची गरज आहे. शनिवार १ जूनपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केल्याचे नगराध्यक्ष कणे यांनी सांगितले. कमी पर्जन्यमान झाल्याने उपलब्ध पाणीसाठे काटकसरीने वापरून भविष्यातील संभाव्य पाणी टंचाई टाळण्याचे कारण सांगत पालिकेने यापूर्वी ११ मार्चपासून दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले होते. पालिकेच्या निर्णयाचे कोणतेही आढेवेढे न घेता जनतेने स्वागत केलेले असतानाही नगर पालिकेने अवघ्या ३ आठवड्यात २ एप्रिल पासून पुन्हा एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेत तातडीने अंमलबजावणी करण्यात आली होती. 

 
Top