|
प्रतिनिधी / उस्मानाबाद
|
| शहरातील दत्तनगर येथे घरातील सदस्य जेवणासाठी बाहेर गेल्याची संधी साधत चोरट्यांनी अवघ्या अडीच तासात पाच लाखांची घरफोडी करून पलायन केले. ही खळबळजनक घटना दि.२६ मे च्या सायंकाळी ५ ते ७.३० वाजेदरम्यान घडली. फिर्यादी चंद्रकांत कृष्णा नवले यांचे एमआयडीसी रोडवरील दत्तनगर येथे घर आहे. रविवारी ते कुटुंबीयांसह जेवण करून साडेसात वाजेच्या सुमारास परतले असता त्यांच्या घराचे मुख्य दरवाज्याचे कुलुप नव्हते. त्यामुळे दरवाजा ढकलून पाहिले असता तो आतून बंद होता. म्हणून त्यांनी घराचे पाठीमागील दरवाज्यातून घरात प्रवेश करून पाहिले असता चोरट्याने कपाटातील रोख रक्कम ६५ हजार रुपये व १३१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी चंद्रकांत कृष्णा नवले यांच्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शहर व जिल्ह्यात वाढलेल्या घरफोड्यांमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. |
