प्रतिनिधी /परंडा-
गुलाल खोबरे रथावर उधळुन "भैरवनाथाच चांगभल, सदानंदीच चांगभल' "देवाच्या माकडाच चांगभल" असा जयघोष करीत गुलालात माखुन निघत लाखो भाविकांनी गुरूवारी (दि.२) परंडा तालुक्यातील सोनारी येथील श्री काळ भैरवनाथाच्या रथोत्सव सोहळ्यात हजेरी लावली. यावेळी गुलाल, खोबरे "श्रीं' च्या रथावर उधळण करीत लाखो भाविकांनी श्रीकाळ भैरवनाथाचा रथ ओढून दर्शन घेतले. यावेळी सोनारी नगरी व भाविक गुलालाने माखुन निघाले होते.
श्रीक्षेत्र सोनारी नगरी श्रीकाळभैरवनाथ रथोत्सवासाठी भाविक भक्तांनी फुलुन गेली होती. गुरुवारी पहाटे श्रीस महाभिषेक घालण्यात आला. दुपारी १२ वाजता पुरणपोळीचा महानैवद्य दाखविण्यात आला. दुपारी २.१५ वाजता फुलानी सजवलेल्या भव्य दिव्य रथामध्ये श्री काळभैरवनाथाची उत्सव मूर्ती ठेवण्यात आली. पुजारी चंद्रकांत महाराज, संजय महाराज, विजयकुमार पुजारी, समीर महाराज धुपआरती हातात घेऊन रथाच्या समोर चालतात. परंपरेनुसार तुतारी पताका, अबदागीरीवाले, कंडारीची मानाची कावड, सांगोल्याची मानाची काटी, बँड पथक, हलगी आदी वाद्यासह वाजत गाजत रथोत्सव मिरवणुकीस मानकरी पुजारी व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. तत्पुर्वी मंदिरात श्रीची महाआरती करण्यात आली. यावेळी आमदार सुजितसिंह ठाकुर, आमदार राहुल मोटे, डॉ. प्रतापसिंह पाटील, युवराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत, दत्ता साळुंके, संजय गाढवे, आण्णा जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके, नवनाध जगताप, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे, नायब तहसीलदार डॉ. तुषार बोरकर, गणेश सुपे, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सिद्दिवाल, नितीन गाढवे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनंजय मोरे, कंडारीचे सरपंच विश्वास मोरे, बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर आदी नेते उपस्थित होते.

 
Top