उस्मानाबाद/प्रतिनिधी - 
जागतिक कामगार दिनानिमित्त बुधवार, दि. 1 मे रोजी शहरातील असंघिटत कामगारांचा उपरणे व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. अंजुमन हेल्थकेअर सोसायटी व सह्याद्री फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात कामगारांना धुम्रपानामुळे होणार्‍या दुष्परिणामांची माहिती देऊन जनजागृती करणारी पत्रके देण्यात आली. 
जगभरात 1 मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन असतो. या दिनाचे औचित्य साधून अंजुमन हेल्थकेअर वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष फेरोज पल्ला व सह्याद्री फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. दिग्गज दापके देशमुख यांच्या संकल्पनेतून सर्वच घटकांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या परंतु समाजात उपेक्षित  असलेल्या असंघटित कामगारांना उपरणे आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानिक करण्यात आले. त्यानंतर कामगारांचे आरोग्य हे त्यांच्या कुटुंबासाठी किती मोलाचे आहे, हे सांगून धुम्रपानापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच धुम्रपानामुळे आरोग्यावर होणार्‍या दुष्परिणामाची माहिती असलेली पत्रके देण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन चौधरी, दिनेश वाघमारे, डी. एन. कोळी, अय्याज शेख, अन्वर शेख, गणेश वाघमारे, गजानन पाटील तसेच असंघटित कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
Top