प्रतिनिधी / तेर-
उस्मानाबाद तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या तेर येथील सरपंच पदासाठी दि. २३ जूनला पोटनिवडणूक होत आहे. यामुळे तेर येथे पुन्हा राजकीय गरमागरमी रंगणार असल्याचे दिसत आहे. त्यासोबतच उस्मानाबाद तालुक्यातील ९ गावांच्या १२ ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुका होत आहेत.
राजकीय दृष्टीने महत्वाच्या तेर ग्रामपंचायतवर डॉ. पद्मसिंह पाटील यांची आजवर एकहाती सत्ता राहीली आहे. परंतु, २०१७ मध्ये झालेल्या जनतेतून थेट सरपंच निवडणुकीत सर्व पक्षीय आघाडीचे उमेदवार म्हणून महादेव खटावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पद्माकर फंड यांचा सरळ लढतीत पराभव करून सत्ता काबीज केली होती.असे असले तरी १७ सदस्य असलेल्या ग्रापपंचायतमध्ये १५ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. त्यामुळे उपसरपंचपदावर बाळासाहेब कदम यांची वर्णी लागली. त्यानंतर सरपंच खटावकर यांना अतिक्रमण केल्याच्या आरोपावरून जिल्हाधिकारी यांनी २२ सप्टेंबर २०१८ रोजी पदासाठी अपात्र ठरवले होते. विभागीय आयुक्तांनीही खटावकर यांचे अपील फेटाळत जिल्हाधिकारी यांचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे खटावकर यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. त्यातच निवडणूक आयोगाने या रिक्त झालेल्या जागेची निवडणूक जाहीर केल्याने वातावरण ढवळून निघाले आहे. या सरपंचपदाच्या निवडणुकीबराेबरच तेरमधील प्रभाग ३ मधील अनु. जमातीच्या सदस्या शिला पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठीही याबरोबरच निवडणूक होणार आहे. एकंदरीत तेरच्या सरपंच पदाच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहेत त्याप्रमाणे इच्छुक भावी सरपंचचाचीही धाकधूक वाढली आहे.
सदस्यांसाठी पोटनिवडणूक 
उस्मानाबाद तालुक्यातील बुकनवाडी (२), डकवाडी, बरमगाव, कोंड, रामवाडी, आंबेवाडी, नांदुर्गा येथील प्रत्येकी १ व पोहनेर ३ व तेर १ अशा १२ सदस्यांच्या जागेवरही पोटनिवडणुका होत आहेत.
निवडणूक कार्यक्रम असा नामनिर्देशन पत्र भरण्याचा दि. ३१ मे ते ६ जून दुपारी ३ वाजेपर्यंत. दि.७ जून रोजी छाननी , दि.१० जूनपर्यंत अर्ज परत घेणे, दुपरी चिन्ह वाटप, दि. २३ जून रोजी सकाळी ७.३० ते ५.३० मतदान तर दि.२४ रोजी मतमोजणी होणार आहे.
 
Top