प्रतिनिधी /लोहारा-
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील हॅलो मेडिकल फाउंडेशन व स्विसएड संस्थेच्या वतीने तालुक्यातील १५ गावांतील १०० महिलांना मदतीचा हात देण्यात आला आहे. दोन महिने पुरेल इतके किराणा साहित्य व रेशनचे वितरण करण्यात आले. लोहारा येथील हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या सभागृहात सोमवारी ( दि. २७) हा कार्यक्रम झाला.
अध्यक्षस्थानी उदतपूरचे सरपंच माधव पाटील होते. यावेळी तहसीलदार विजय अवधाने, बाबासाहेब जाधव, पत्रकार गिरीश भगत, सुरेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. दुष्काळामुळे एकल, विधवा, परित्यक्ता महिलांना अनेक अडचणी येत असतात. त्यामुळे त्यांना मदत म्हणून रेशन व किराणा माालाचे वितरण करण्यात आले. यामुळे या महिलांना दुष्काळी परिस्थितीमध्ये आधार मिळाला आहे. तालुक्यात माेठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळणे अशक्य झाले आहे. त्यासोबत भोजन साहित्य मिळवण्यासाठीही मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे हॅलो मेडिकल फाउंडेशन व स्विसएड संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे. यावेळी शासनाच्या योजना महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही तहसीलदार विजय अवधाने यांनी सांगितले. महिलांनी आपल्या अडचणी पोहोचवा मी सोडविण्यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी माधवराव पाटील, बाबासाहेब जाधव यांनीही मार्गदर्शन केले. दुष्काळी परिस्थितीत खचून न जाता धैर्याने संकटाला सामोरे जा, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी तीन महिलांनी अडचणी मांडल्या. प्रास्ताविक सतीश कदम यांनी तर वासंती मुळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. या कार्यक्रमासाठी विश्वंभर शहापुरे, श्रीकांत मोरे, संग्राम पाटील, अविनाश पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. 
 
Top