प्रतिनिधी /उस्मानाबाद-
|
| उस्मानाबादेत शिवसेनेच्या पालिकेतील दोन गटातील वाद बुधवारी (दि.८) रात्री उफाळून आला. यामध्ये एकावर हल्ला करून मारहाण केल्याप्रकरणी उपनगराध्यक्षांसह वीस ते बावीस जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी जखमी अजय नाईकवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 'तू गाव सोडून जा नाहीतर तुझे हात पाय तोडून खल्लास करीन' असे म्हणत सूरज साळुंके (उपनगराध्यक्ष), सागर साळुंके, दादा घोरपडे, नरसिंग मिटकरी, सागर ईटकर, पंकज माने व इतर पंधरा ते वीस जणांनी (सर्व रा. उस्मानाबाद) लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच चैन, अंगठी व रोख रक्कम असा ९५ हजार रुपयांचा ऐवज काढून घेतल्याचे म्हटले आहे. हा प्रकार उस्मानाबाद येथील रामनगर येथील जॉनी हॉटेल समोर घडला असून यामध्ये अजय नाईकवाडी (रा.गणेश नगर उस्मानाबाद) जखमी झाला आहे. यावेळी अजय नाईकवाडी यांच्या गळयातील २ तोळे सोन्याची चैन तोडून घेतली व सागर साळुंके याने हातातील अंगठी व मोबाईल काढून घेतला, फायटरने अजय नाईकवाडी यांच्या नाकावर मारून जखमी केले. दादा घोरपडे याने अजय नाईकवाडी यांच्या पाठीमागील खिशातील २० हजार रुपये काढून घेतले, असे तक्रारीत नमूद केले आहे. तर इतर आरोपींनी लाथाबुक्याने मारहाण केली. याप्रकरणी अजय व्यंकटराव नाईकवाडी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे. |