प्रतिनिधी / भूम नवरा-बायकोतील वादानंतर बायको माहेरी गेल्याने वाद मिटवून तिला आणण्यासाठी गेलेल्या नातलगापैकी एकाचा सुऱ्याने भोसकून खून केल्याप्रकरणी बाप-लेकास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. परंडा तालुक्यातील अनाळा येथील सुधाकर राजमल शिंदे याची बायको मयुरी उर्फ लक्ष्मी ही नवरा-बायकोतील वादामुळे माहेरी वडणेर (ता. परंडा) येथे बऱ्याच दिवसांपासून रहात होती. तिला नांदावयास आणून व वाद मिटविण्याकरीता सुधाकरचे नातलग वडणेरला गेले होते. यावेळी झालेल्या वादातून आरोपी काशिनाथ यशवंत काळे व बारक्या काशिनाथ काळे या बापलेकांनी सुऱ्याने भोसकल्याने सागर पंडित शिंदे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी परंडा पोलिस ठाण्यात रबिलीबाई शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद होऊन आरोपींना अटक करण्यात आली. प्रकरणाची भूम येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश-२ आर. व्ही. उत्पात यांच्यासमोर सुनावणी झाली. तपास अधिकारी सपोनि एस. एन. साबळे यांनी केलेला तपास, अतिरिक्त शासकीय अभियोक्ता प्रवीण गाडे यांनी मांडलेली सक्षम बाजू तसेच साक्षी, पुराव्यांची दखलदखल घेत न्यायालयाने दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी २५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. |