प्रतिनिधी /उस्मानाबाद
तीन महिन्यांपासून दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आतुरतेने वाट पहात असलेल्या खरीप हंगाम २०१८ चा पीकविमा अखेर जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील ६ लाखावर खातेदारांना पीकविम्यापोटी ५३७ कोटीहून अधिक रक्कम मंजूर झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पीकविमा सोयाबीनला ३७५ कोटीवर मिळाला असून त्यापाठोपाठ तुरीच्या पीकाला ८५ कोटी रुपयांचा विमा मिळाल्याची माहिती आहे. यातील काही पीकांचा विमा शेतकऱ्यांना थेट खात्यावर जमा होण्यास प्रारंभ झाला असून सोयाबीन व तुरीचा विमा येत्या काही दिवसात जमा होण्यास प्रारंभ होईल अशी माहिती मिळाली आहे.
जिल्ह्यातील शेतकरी मागील दोन वर्षापासून दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात आहे. त्यातच खरीप हंगाम २०१७ मध्ये उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना पीकविमा मिळालेला नसून यासाठी अद्याप लढा सुरू आहे. तसेच ज्यांना विमा मिळाला ती रक्कमही तुटपुंजी मिळाल्याने दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती. त्यापाठोपाठ २०१८ चा खरीप हंगामही वाया गेल्याने जिल्ह्यातील लाखो शेतकरी हवालदिल झाले होते. यामुळे आर्थिक अडचणीतील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष खरीप २०१८ च्या पीकविम्याकडे लागले होते. सततची दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या या पार्श्वभूमीवर खरिपाचा पीकविमा तातडीने मिळावा अशी मागणी जानेवारी महिन्यापासूनच करण्यात येत होती. परंतु, आज-उदया म्हणता म्हणता खरीपाचा पीकविम्याची रक्कम मंजूर होण्यास एप्रिल महिना उजाडला आहे. याबाबत नुकतेच कृषी विभागाला १० पिकांचे लाभार्थी शेतकरी, विमा संरक्षीत रक्कम, मंजूर विमा आदीची माहिमी प्राप्त झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील महत्वाचे सोयाबीन, तुर व कापूस ही तीन पीके दिसत नसली तरी वरिष्ठ पातळीवरून मिळालेल्या माहितीनुसार सोयाबीनला ३७५ कोटी, तुर पिकाला ८५ कोटी रुपये मंजूर झाल्याचे समजते. यासर्वांची एकत्रित बेरीज केल्यास विम्यासाठी ९ लाखावर अर्ज केलेल्यापैकी शेतकऱ्यांच्या ७ लाखावर विमा हप्त्याच्या अर्जापोटी पीकविम्याची रक्कम मंजूर झाली आहे. 
 
Top