प्रतिनिधी/ तुळजापूर-
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी (दि.२७) तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यानंतर मंदिर परिसरातील अस्वच्छता पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुनगंटीवार शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तुळजापुरात आले. त्यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले व साडीचोळीची पूजा केली. देवी दर्शनानंतर मंदिर संस्थानच्या वतीने धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले यांनी मुनगंटीवार यांचा सत्कार केला. यावेळी विकास प्राधिकरणाचे सदस्य नागेश नाईक, विकास मलबा, गुलचंद व्यवहारे, प्रवीण पाठक, इंद्रजित साळुंके, सार्थक मलबा आदींची उपस्थिती होती. दरम्यान मंदिराच्या बाहेर महाद्वारसमोर पडलेला कचरा, चपलांचा ढिगारा बघून मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच महाद्वारासमोरील पायऱ्यांमुळे परिसर स्वच्छ दिसत नसल्याचे सांगून पायऱ्या काढण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. दरम्यान, तुळजापूर विकास प्राधिकरणासाठी वाढीव निधी देण्याविषयी सकारात्मक चर्चा झाल्याचे प्राधिकरणाचे सदस्य विकास मलबा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. धार्मिक व्यवस्थापक इंतुले यांनी मुनगंटीवार यांचा सत्कार केला.
|