उस्मानाबाद/प्रतिनिधी -
माथाडी कामगार म्हणून भरती करून नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केलेल्या आराेपींची अतिरिक्त जिल्हा न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता झाली आहे.
परंडा तालुक्यातील कौडगाव येथील उत्रेश्वर ढवळे व गावातील सात लोकांना आराेपी पांडुरंग हरीभाऊ शेंडगे व भास्कर माणिकराव पाडोळे (रा. रुषी नगर पुणे) यांनी आपसात संगनमत करून माथाडी कामगार युनियन चिंचवड पुणे येथे हमाल म्हणून भरती करून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून प्रत्येकी ७० हजार रुपये घेतले होत. वारंवार विचारणा करूनही नोकरी व पैसेही परत दिले नाही. यामुळे उत्रेश्वर ठवरे यांनी परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणी सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परंडा यांच्या न्यायालयात होऊन आरोपींना ४२० अन्वये दोषी ठरवून २ वर्षे कारावास व प्रत्येकी ३ हजार रुपयांचा दंड सुनावला होता. आरोपीने अॅड. सुधाकर तांबे यांच्या मार्फत भूम अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले. सुनावणी होऊन आरोपींनी फिर्यादीकडून नोकरीचे आमिष दाखवून पैसे स्वीकारल्याचे तसेच आरोपींनी फिर्यादीची फसवणूक केल्याबाबतचा विश्वासर्ह पुरावा नाही. फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती असल्याने आरोपींच्या वकीलाचा युक्तीवाद ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय भूम यांनी आरोपींचे अपील मंजूर करून निर्दोष मुक्तता केली.
 
Top