
शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले हाेते. अभिषेक, जन्मोत्सवाचे कार्यक्रम घेण्यात आले. महिला, बालकांची चांगला उत्साह होता. जयंतीनिमित्त व्यापाऱ्यांनी दुकाने दिवसभर बंद ठेवली होती.
उस्मानाबाद येथे श्री जन्मकल्याणक महोत्सव उस्मानाबाद शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातून ढोल पथकाच्या निनादात शोभायात्रा काढण्यात आली. सकाळी शहरातील माऊली चौकातून शोभायात्रेचा प्रारंभ झाला. महावितरणचे अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील, भारतीय जैन संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षा कांचनमाला संगवे यांच्या हस्ते शोभायात्रेचा शुभारंभ झाला. व्यासपीठावर राजकुमार अजमेरा, राजाभाऊ जगधणे, संतोष शहा, अॅड. शांतीलाल कोचेटा, महावीर दुरूगकर यांची उपस्थिती होती. शोभायात्रेत महिला, युवक, बालके मोठ्या संख्येने उपस्थित हाेते. यावेळी ढोलपथकामध्ये सहभागी झालेल्या युवक व युवतींनी शानदार सादरीकरण केले.
जैनसाध्वी स्नेहमती, वात्सल्यमती, चंदनमती, स्वभावमती यांच्या सानिध्यात मंदिरात कार्यक्रम घेण्यात आले. सूत्रसंचालन सकल जैन समाज अध्यक्ष उल्हास चाकवते यांनी केले. आभार कुणाल गांधी यानी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश फडकुले, अमित गांधी, अतुल अजमेरा, नीलेश झरकर, अतुल कांबळे, मनोज कोचेटा, सुमित कोठारी, मनोज चाकवते, प्रवीण बोपलकर यांनी योगदान दिले. जयंतीनिमित्त पहाटेपासून अभिषेक व पूजन करण्यासाठी जैन मंदिरात गर्दी झाली होती. तसेच गुजर गल्ली येथील मंंदिरात मंगल प्रभावणा झाली. माऊली चौक मंदिरात चढावाचे कार्यक्रम झाले. यावेळी भगवान महावीरांच्या मूर्तीला महामस्तकाभिषेक करण्यात आला. सायंकाळच्या दरम्यान महावीर भगवान पाळण्याचा कार्यक्रम पार पडला.