प्रतिनिधी /उस्मानाबाद
मागील पाच वर्षात राज्यशासन व केंद्र शासनाची आर्थिक स्थिती डगमगली आहे. राज्यावरील कर्जाचा आकडा ५ लाख ३५ हजार कोटीवर गेला असून यापोटी दरवर्षी ६८ हजार कोटी रुपये फक्त व्याज भरावे लागते. हा कर्जाचा डोंगर उभारताना दुसरीकडे कोठेच विकास दिसत नाही. त्यामुळे जनतेच्या बदल घडविण्याची मानसिकता असल्याचे मत काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील येथे व्यक्त केले.
उस्मानाबाद मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि.१२) आयोजित पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, २०१४ मध्ये भाजपने १२५ घोषणांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, प्रत्यक्षात नोटबंधी व जीएसटीमुळे एका वर्षात एक कोटी तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. कर्जमाफीची घोषणा फसवीच निघाली असून अद्यापही हजारो शेतकरी यापासून वंचित आहेत. १२ ते १३ मंत्र्यांवर गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर त्यांची चौकशी करण्याऐवजी मुख्यमंत्री क्लिनचिट देत सुटले. या सर्व बाबी आकडेवारी रेकॉर्डवर असून या सरकारने क्लिनचिट कॅबिनेट सुरू करावे, असा टोलाही लगावला. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर केला. परंतु, त्यासाठीच्या उपाययोजना दिसत नाहीत. वीजबिल माफ झाले नाही, शैक्षणिक फीस माफ झाली नाही, हाताला रोजगार नाही एकंदरीत हे सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही, असा आरोप केला. यावेळी काँग्रेसचे आमदार मधुकरराव चव्हाण, जिप अध्यक्ष नेताजी पाटील, जीवनराव गोरे, जिप उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील, विश्वास शिंदे, सुरेश देशमुख, डॉ. स्मीता शहापूरकर, मधुकरराव तावडे आदींची उपस्थिती होती.
अॅड. आंबेडकर भाजपची बी टीम वंचित बहुजन आघाडी व अॅड. प्रकाश आंबेडकर ही भाजपची बी टीम असल्याचा अारोप त्यांनी केला. काँग्रेस व राष्ट्रवादीने समविचारी पक्षाच्या बैठकीत त्यांना १० जागा देण्याची तयारी दर्शविली. परंतु, अॅड. आंबेडकर यांनी १२ जागा मागितल्या. थोडे दिवस गेल्यानंतर चर्चेतून यावरही सहमती होत असताना अॅड. आंबेडकर यांनी २२ जागांची मागणी केली. आमची इच्छा मतांचे विभागूून होऊन महायुतीला फायदा होऊ नये. अशी होती. परंतु, हे अॅड. आंबेडकर यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी भाजपच्या इशाऱ्यावर आघाडीत येण्याचे टाळून बी टीम म्हणून काम करत आहेत. 
 
Top