प्रतिनिधी / तेर
उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी येथे सोमवारी (दि.२२) भरदुपारी १२ वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत कडब्याच्या गंजीसह ऊसाचे वाडे, सोयाबीनचे भुस्कट, तसेच शेतीउपयोगी साहित्य जळून मोठे नुकसान झाले.
या आगीमध्ये ७ हजार कडबा, २ हजार उसाचे वाडे, ३५ बॅग सोयाबीनच्या भुस्कटासह शेती उपयोगी साहित्य जळाले. यामध्ये शेतकरी अंगद मारुती भोसले, विष्णू भोसले, शिवाजी भोसले, सुधीर भोसले या शेतकऱ्यांनी गावाच्या कडेला कडबा, ऊसाचे वाडे, भुस्कट आदी गंज लावून ठेवले होते. याला अचानक आग लागून हे नुकसान झाले. तसेच या आगीमध्ये शिवाजी भोसले या शेतकऱ्यासह त्यांचा बैलही जखमी झाला आहे. या घटनेची ग्रामस्थांना माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहोचून शर्थीचे प्रयत्न करत तब्बल तीन तासांनी आग आटोक्यात आणली. विशेष म्हणजे आगीची तीव्रता वाढत असताना आग विझविण्यासाठी पाण्याची कमतरता पडत असतानाच सतिश सोमाणी यांनी चारा छावणीतील पाण्याने भरलेले दोन टँकर घटनास्थळाकडे पाठविल्याने आग विझवण्यासाठी मदत झाली. तर जयप्रकाश राजेनिंबाळकर यांनी स्वतःहून आग विझविण्यासाठी घटना स्थळांवर शर्थीचे प्रयत्न केले. ऐन दुष्काळात चाराटंचाईच्या काळातच शेतकऱ्यांवर ही नुकसानीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. 
 
Top