जिल्ह्यातील सहकारी संस्थांची वाट लावून व उद्योगधंद्यातील दलालखोरीमुळे जिल्ह्याला मागास ठेवणाऱ्या या भ्रष्टवादी पाटील खांदानाला राजकारणापासून हद्दपार करण्यासाठी तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेली मतविभागणी टाळण्यासाठी कार्यकर्त्यांच्या विचाराअंती शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला असून महायुतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर याना प्रचंड बहुमताने विजयी करा असे प्रतिपादन संजय पाटील दुधगावकर यांनी केले. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उस्मानाबाद येथे जाहीर प्रचार सभा संपन्न झाली. याचवेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला कडाडून विरोध करणारे व शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी आंदोलने करणारे तसेच गतवेळी विधानसभा निवडणुकीत कळंब उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातून भाजपच्या वतीने निवडणूक लढवलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनीविवीध मान्यवरांच्या उपस्थित शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर श्री पाटील यांनी कळंब- उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील गावोगावी जाऊन मतदारांच्या भेटी घेत महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत . यावेळी बोलताना दुधगावकर सांगतात की राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भ्रष्टवादी पाटील घराण्याने जिल्ह्यावर आपलाच वरचष्मा राहावा यासाठी घराणेशाही करत जिल्हा बँक, दूध संघ यासारख्या वेगवेगळ्या सहकारी संस्था मोडीत काढल्या. जिल्ह्यात आलेले उद्योग सुद्धा यांच्या दलालखोरीमुळे निघून गेले. सत्ताकाळात शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय यांनी घेतलेला नसून केवळ स्वतःचा विकास केला आहे. अशा या भ्रष्टवादी पाटलांची गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत केवळ मत विभाजनामुळे लाट लागली. आगामी लोकसभा निवडणुकीत हे मत विभाजन टाळण्यासाठी आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या संजय पाटील दुधगावकर मित्र मंडळाचे कार्यकर्ते व मतदारांच्या बैठका घेऊन शिवसेना पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला आहे .ओमराजेंना मत म्हणजे मला व विकासाला मत आहे. त्यामुळे देशाला कणखर पंतप्रधान पुन्हा लाभण्यासाठी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या धनुष्यबाण समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असेही आवाहन श्री दुधगावकर यांनी केले आहे.