तेर/प्रतिनिधी-
 भाजप-सेना युती सरकारने मोठमोठी आश्वासने देवून देशात आणि राज्यात सत्ता मिळविली. मात्र त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. 350 रूपयांना मिळणारा घरगुती गॅस हजारावर नेणार्‍यांना महागाई कमी करण्याची भाषा शोभली का ? याचा मतदारांनी विचार करावा. नोकरी नाही, महागाई कमी नाही, पाणी नाही, रस्ते नाहीत तरीही पुन्हा युती सरकार मत मागत आहे. जनतेला दिलासा देता येत नाही. तरी सरकारला लाज कशी वाटत नाही ? असा संतप्त सवाल महाआघाडीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उपस्थित जनसमुदायासमोर उपस्थित केला. 
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे मंगळवारी सकाळी उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रचारसभा घेतली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, मल्हार पाटील, तेर येथील राष्ट्रवादी काँगे्रस, काँग्रेसचे पदाधिकरी, कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत आपण विजयी होणार, असा आपल्याला आत्मविश्वास आहे. त्यापेक्षा अधिक मोठा आनंद हा तेरचा रहिवाशी म्हणून लोकसभेत आपल्या भागाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी आपल्याला आहे. युती सरकारच्या काळात पीकविम्याच्या बाबतीत, अनुदानाच्या बाबतीत आपल्यावर मोठा अन्याय झाला आहे. सोयाबीन पीकविम्याच्या पीककापणी प्रयोगात झालेल्या अन्यायावर सरकार काय बोलले ? हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे अडचणीच्या काळात शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार्‍या सरकारला धडा शिकविण्यासाठी मतदारांनी राष्ट्रवादीसोबत रहावे, असे आवाहन पाटील यांनी केले. 
 
Top