प्रतिनिधी /उस्मानाबाद
शहरात मंगळवारी जिल्हा परिषदेतील सर्व शिक्षा अभियानातील डेटा एन्ट्री ऑपरेटरला लाच घेताना कारवाई करून गजाआड करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी (दि. १७) शहर पोलिस ठाण्यात कारवाई करून पोलिस नाईक बालाजी अनंता मुंढे याला तीन हजाराची लाच घेताना गजाआड केले.
तक्रारदार यांच्या मित्रावर मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल असून याप्रकरणाचा तपास उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक बालाजी अनंता मुंढे (३५) यांच्याकडे होता. या प्रकरणात तपासामध्ये मदत करण्यासाठी पोलिस नाईक मंुढे याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी करत होता. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी व पोलिस उपाधीक्षक बी. व्ही. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनय बहीर यांनी तक्रारीची शहानिशा करून बुधवारी (दि.१७) शहर पोलिस ठाणे येथे सापळा रचला. त्यानंतर तक्रारदाराकडून वरील कामाकरिता पोलिस नाईक मुंढे याने ३ हजार रुपयांची लाच स्विकारताच रंगेहाथ पकडून पुढील कारवाई करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक विनय बहीर करत आहेत.
मंगळवारीच्या घटनेत तक्रारदार यांच्या मुलीचे २०१९-२०२० या वर्षासाठीचे बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियामध्ये मदत केली म्हणून जिल्हा परिषद उस्मानाबाद येथील शिक्षण विभागातील डाटा एन्ट्री ऑपरेटर सिकंदर चव्हाण यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर एसीबीने सापळा रचून दि. १६ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेतील सर्व शिक्षा अभियानातील डाटा एन्ट्री ऑपरेटर शिवलींग चव्हाण (३९) यांनी तक्रारदारांकडून २ हजार रुपये लाचेची रक्कम स्विकाल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले. सदरची लाचेची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये स्विकारण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.
 
Top