प्रतिनिधी / तेर
वैराग्यमहामेरू संत गोरोबाकाका व शिवमंदिराचा कारभार पाहण्यासाठी लातूरच्या धर्मादाय सह आयुक्तांनी प्रशासक म्हणून पी. बी. भोसले यांची नियुक्ती केली आहे.
या न्यासाच्या उद्भवलेल्या वादाचा निकाल तीन महिन्याच्या आत देण्याचा आदेश उस्मानाबाद येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना देण्यात आले असून वाद मिटेपर्यंत प्रशासक म्हणून सहाय्यक धर्मादाय आयुक्त पी. बी. भोसले हे काम पाहणार आहेत. संत शिरोमणी गोरोबाकाका व शिवमंदिराचा कारभार पाहण्यासाठी प्रथम विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर बऱ्याच वाद-विवादानंतर १९९७ मध्ये तेर व परिसरातील पाच जणांची फीट पर्सन म्हणून धर्मादाय आयुक्तांनी नेमणूक केली होती. परंतु, तेरमधील काही जणांनी तीन महिन्यापूर्वी बदलाव प्रस्ताव दाखल केला त्यामुळे फीट पर्सन व बदलाव प्रस्तावातील व्यक्ती यांच्यामध्ये वर्गणीच्या कारणावरून वाद उद्भवला होता. त्या अनुषंगाने पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कलम सीआरपीसी १४९ नुसार दोन्ही बाजूच्या लोकांना नोटिसा बजावल्या होत्या.
२९ एप्रिलपासून संत गोरोबाकाकांचा वार्षिक समाधी सोहळा चालू होत असून त्या अनुषंगाने लातूरच्या धर्मादाय सह आयुक्तांनी लातूर येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त पी. बी. भोसले यांची प्रशासक म्हणून १६ एप्रिल २०१९ रोजी पुढील आदेश येईपर्यंत नेमणूक केली आहे. दि. २६ एप्रिल रोजी पदभार स्वीकारला असून भाविकांच्या सेवेसाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्नशील असल्याचे भोसले यांनी सांगितले. 
 
Top