प्रतिनिधी/उमरगा-
तालुक्यातील मुळज येथील श्री जटाशंकर तीर्थक्षेत्र यात्रा महोत्सवानिमित्त शुक्रवारी (दि.१९) सकाळी नऊ वाजता मानाची काठी व 'श्रीं'ची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. शनिवारी सकाळी श्री छत्रपती शिव-शंभू फाउंडेशनच्या वतीने महारक्तदान शिबिर होणार असून दुपारी कुस्त्यांच्या दंगली रंगणार आहेत. 
मुळज गावच्या पूर्वेला एक किलोमीटर अंतरावर प्राचीन शिल्प कलेचा उत्तम नमुना असलेले श्री जटाशंकर हेमाडपंती मंदिर देवस्थान असून चैत्र पौर्णिमेला दरवर्षी देवस्थानची यात्रा भरते. यात्रा काळात दररोज भजन, कीर्तन आदींसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. यात्रेनिमित्त पुणे येथील राकेश मुगले यांनी संपूर्ण हेमाडपंथी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करून मंदिराच्या गाभाऱ्यासह मुख्यद्वार विविध सुगंधित भारतीय व परदेशी फुलांनी सजवून आरास केली. शुक्रवारी सकाळी मानाची काठी व श्री जटाशंकर मूर्तीची व पालखीचे मानकऱ्यांच्या हस्ते पूजा व धुपारती करण्यात आली. यावेळी देवस्थान ट्रस्टचे रघुनाथ बिराजदार, महंत वामणगीर महाराज, गोविंदगीर महाराज, काठीचे मानकरी शिवाजीराव बिराजदार, पंढरीनाथ बिराजदार, तात्याराव बिराजदार, व्यंकट बिराजदार आदी उपस्थित होते. यावेळी काठी व श्री च्या पालखीची गावातील प्रमुख मार्गावरून ढोल, ताशा, बॅन्ड, हलगी, टाळ मृदंगाच्या निनादात, झांजपथक, नगारे व आकर्षक फटाक्यांची आतषबाजी करीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. शिवाय गावातील ठरावीक ठिकाणी भारूड व दहीहंडी काला फोडण्यात आला. सायंकाळी पाचच्या सुमारास बिरुदेवाचे पुजाऱ्यांनी येणाऱ्या वर्षातील पर्जन्यमान, रोगराई, पीक पाण्याची भाकनुक केल्यानंतर दहीहंडी काला फोडण्यात आला. सायंकाळी सहा वाजता काठी व पालखीचे हेमाडपंथी श्री जटाशंकर मंदिराकडे प्रस्थान झाले. देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या वतीने भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. 
मुळज येथे शुक्रवारी सकाळी श्रींच्या पालखीचे भाविकांनी दर्शन घेतले.  
Top