उस्मानाबाद/प्रतिनिधी
- जिल्हा प्रशासनातर्फे काल (दि.11 एप्रिल रोजी) दिव्यांगांच्या विशेष मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या माध्यमातून दिव्यांगांनी नागरिकांना आवाहन केले की, मतदान करा.. लोकशाहीला बळकट करा!
यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक आर.राजा, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हा समाजकल्याण अधिकारी नागेश चौगुले, तहसिलदार व स्वीपचे नोडल अधिकारी अभय म्हस्के, उपशिक्षणाधिकारी श्री. चंदनशिवे, शिक्षणाधिकारी श्री. सुसर, श्रीम.भोसले, येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदिप तांबारे आदी उपस्थित होते.
या रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून सायंकाळी 6 वाजता झाली. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरु होवून शिवाजी चौक व तेथून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली.
या रॅलीच्या निमित्ताने दिव्यांग विद्यार्थ्यांनी पथनाटयाद्वारे मतदार जागृतीचा संदेश देवून रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांची मने जिंकली.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी निवडणूक प्रक्रियेतील मतदारांचा सक्रिय सहभाग, यशस्वी व सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचे असल्याने 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी येत्या 18 एप्रिल रोजी मोठया संख्येने मतदान करावे, असे आवाहन करुन जिल्हा प्रशासनाने मतदानाच्या दिवशी दिव्यांगांसाठी केलेल्या विशेष सोईसुविधांविषयीची माहिती उपस्थितांना दिली आणि या रॅलीमध्ये उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी, विदयार्थी, नागरीक, प्रसारमाध्यम प्रतिनिधी या सर्वांचे आभार मानले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, पोलीस अधीक्षक आर.राजा यांनीही उपस्थितांशी संवाद साधून 18 एप्रिल रोजी सर्वांनी निश्चितपणे मतदान करावे, संविधानाने दिलेली ही अमूल्य संधी वाया घालवू नये असे आवाहन केले.
जिल्ह्यात मतदानाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करुन मतदानाचे प्रमाण वाढावे, याकरिता भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विविध माध्यमातून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. देशाच्या विकासाला दिशा देण्यासाठी आपण मतदान करणे, हे प्रत्येक मतदाराने लक्षात घेऊन जाणीवपूर्वक मतदान केले पाहिजे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून शासकीय अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थीनी आणि दिव्यांगांच्या मतदार जागृती रॅली आयोजित करण्यात आल्या.
या रॅलीत शहरातील विविध सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी, सामाजिक संघटना, दिव्यांग विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उत्साहाने उपस्थित होते.