प्रतिनिधी/उस्मानाबाद
उस्मानाबादच्या आनंद नगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या ठाण्यात कार्यरत कनिष्ठ महिला अधिकाऱ्यास जाणूनबजून कक्षात बोलावून मानसिक त्रास, छळ केल्याची तक्रार सदरील महिला अधिकाऱ्याने केल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत दि.२८ मार्च रोजी डायरीला नोंद झाल्याची माहिती मिळाली असून याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत.
उस्मानाबाद शहरातील आनंद नगर पोलिस ठाण्यात कार्यरत एका महिला पोलिस अधिकाऱ्यास वरीष्ठ अधिकाऱ्याने सतत केबीनमध्ये बोलावून खासगी विषयावर सातत्याने प्रश्न विचारून मानसिक त्रास देत छळ केल्याची नोंद खुद्द महिला पोलिस अधिकाऱ्याने स्टेशन डायरीमध्ये केली आहे. यामध्ये सतत केबिनमध्ये बोलावून सदरील पोलिस अधिकाऱ्याची नुकतीच आनंदनगर पोलिस ठाण्यात वर्णी लागली असून त्याने आपल्या कनिष्ठ महिला अधिकाऱ्यास त्याच्या कक्षामध्ये सतत बोलावून 'तू अजून लग्न का केले नाहीस, वय वाढत चाललं आहे, तुझी रूम कोठे आहे असे खासगी प्रश्न विचारून तिला मानसिक त्रास देत छळ केल्याची नोंद सदरच्या महिला अधिकाऱ्याने पोलिस ठाण्याच्या डायरीत केली आहे. याबाबत ठाण्यातील संगणकामध्येही महिला अधिकाऱ्याने टिप्पणी नोंदविल्याचे कळते. याबाबत माहिती मिळताच पोलिस अधीक्षक आर. राजा यांनी सदरच्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे कळते. 
 
Top