उस्मानाबाद- प्रतिनिधी
शहरात सोमवारी (दि.२५) दुपारी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यानंतर कडक ऊन पडले. मात्र, दोन तासानंतर सायंकाळी पुन्हा पावसाच्या सरींचा शिडकावा झाला. येडशी, ईट, तुळजापूर, लोहारा भागातही रिमझिम सरी बरसल्या. दरम्यान, वातावरणात दोन दिवसांपासून वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत असून, सोमवारी अचानक रिमझिम सरींची बरसात झाल्याने नागरिकांची काहीवेळ उकाड्यातून सुटका झाली. 
सोमवारी दुपारी दोनच्या दरम्यान उस्मानाबाद शहरात काही वेळ रिमझिम पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा कडक उन्हाचे चटके सुरू झाले. अचानक आलेल्या पावसाच्या सरींमध्ये भिजून चिमुकल्यांनी आनंद लुटला. काहीवेळ ढगाळ वातावरण तयार झाले होते. मात्र, त्यानंतर उन्हाचा पारा वाढला.सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली. १५ ते २० मिनिटे हलक्या सरी बरसत होत्या. पावसाने काही वेळ वातावरण आल्हाददायक झाले होते. दरम्यान, येडशी, ईटमध्ये पावसाने पाणी साचले होते. मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने आंबा, द्राक्ष उत्पादकांचे काही प्रमाणावर नुकसान झाले. 
मेघगर्जनेसह अवकाळी पावसाच्या सरींची बरसात उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारी विविध भागात अवकाळी पाऊस झाला. शेतातून काढून ठेवलेल्या पिकांवर झाकण्यासाठी वाशी शहरात ताडपत्रीची विक्री सुरू झाली होती. 
उंबऱ्यात वीज पडून गाय ठार येरमाळा - सोमवारी दुपारी व त्यानंतर सायंकाळी विजेच्या कडकडाटासह अवकाळी रिमझिम पाऊस झाला. चार वाजेच्या दरम्यान उंबरा येथील शेतकरी अशोक सुब्राव जाधव यांच्या मालकीची शेतात बांधलेली गाय अंगावर वीज पडून ठार झाली.त्यानंतर दुसरी वीज एका सिंधीच्या झाडावर पडल्याने झाडाला आग लागली. आगीनंतर या झाडाच्या फांद्या जळून खाली पडत असल्याचा व्हीडीओ सोशल मिडियावर अवघ्या पाच मिनिटात व्हायरल झाला. 
 
Top