धाराशिव (प्रतिनिधी)- येडशी येथील भीषण आगीच्या दुर्घटनेत करंडे कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण महाराष्ट्रासाठी स्वतंत्र, सक्षम आणि तातडीने प्रतिसाद देणारी अग्निशमन यंत्रणा आणि त्याचे स्पष्ट धोरण तयार करण्यात यावे या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या करंडे कुटुंबातील वारसांना विशेष आर्थिक सहाय्य देण्यात यावे अशी विनंती देखील मान्य केली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
धाराशिव तालुक्यातील येडशी येथे 9 नोव्हेंबर रोजी पहाटे करंडे कुटुंबाच्या घरवजा दुकानाला भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन बालके आणि दोन ज्येष्ठ नागरिकांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आपण स्वतः घटनास्थळी धाव घेतली, सुरुवातीला धाराशिवहून आलेला एकच अग्निशमन बंब उपलब्ध होता. आगीची तीव्रता लक्षात घेऊन तुळजापूर आणि कळंब येथून अतिरिक्त अग्निशमन वाहने तातडीने मागवली. मात्र, अतिरिक्त यंत्रणा पोहोचेपर्यंत महत्त्वाचा वेळ निघून गेला होता.
या घटनेने ग्रामीण भागातील अग्निशमन व्यवस्थेतील त्रुटी अधोरेखित केल्या आहेत. ग्रामीण भागात स्वतंत्र अग्निशमन केंद्रे नसल्याने आग लागल्यानंतर 25 ते 50 किलोमीटर अंतरावरून अग्निशमन वाहने बोलवावी लागतात. त्यामुळे मदत पोहोचण्यास विलंब होतो. या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागांतील अग्निशमन सुविधांचे राज्यव्यापी सर्वेक्षण करून स्वतंत्र ग्रामीण अग्निशमन धोरण तयार करावे या आपल्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
