कळंब (प्रतिनिधी)-  कर्तव्यदक्षता, प्रसंगावधान आणि तत्परतेचे दर्शन घडवत कळंब बसस्थानकातील एसटी कर्मचारी आणि पोलिसांनी सुमारे दहा लाख रुपयांचा ऐवज चोरीला जाण्यापासून वाचवला. पाडव्याच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेत सात तोळे सोने आणि रोख रक्कम असलेली पर्स अवघ्या काही मिनिटांत शोधून काढण्यात यश आले. या धाडसी व तत्पर कामगिरीबद्दल पोलीस कर्मचारी दिगंबर अंजान यांचा राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.

तालुक्यातील हिंगणगाव येथील श्रीदेवी गणेश काटे हे कुटुंब नगर येथून आपल्या गावी परतत होते. ते कळंब बसस्थानकात कळंब-धाराशिव बस क्रमांक 9731 मध्ये बसत असताना त्यांच्या बॅगेतील सोन्याची पर्स आणि रोख रक्कम अज्ञात महिलांनी लंपास केली. मात्र, बस सुटण्यापूर्वीच ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वाहतूक नियंत्रक अनीस पठाण यांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वाहतूक नियंत्रक पठाण यांनी तातडीने स्थानकावर कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी दिगंबर अंजान यांना पाचारण केले. पोलिसांनी तत्काळ बसकडे धाव घेत बसचा दरवाजा बंद केला. वाहक नागटिळक आणि चालक एल. बी. बांगर यांनीही प्रसंगावधान राखत बसचा ताबा घेतला आणि कोणत्याही प्रवाशाला बसमधून चढ-उतार करू दिले नाही.

यानंतर पोलीस कर्मचारी अंजान आणि वाहतूक नियंत्रक पठाण यांनी बसमध्ये झाडाझडती सुरू केली. काही वेळातच बसच्या सीटखाली संशयित पर्स आढळून आली. तपासणी केली असता त्यामध्ये जवळपास सात तोळे सोने आणि रोख रक्कम असा एकूण सुमारे दहा लाख रुपयांचा ऐवज सुरक्षित असल्याचे निदर्शनास आले. वेळेवर दाखवलेल्या सतर्कतेमुळे काटे कुटुंबाचा लाखमोलाचा ऐवज पुन्हा त्यांच्या हाती लागला. यावेळी आगारप्रमुख विजयकुमार घोलप, पोलीस निरीक्षक शकील शेख, हभप. महादेव महाराज अडसूळ, स्थानकप्रमुख बालाजी मुळे, वाहतूक नियंत्रक गोविंद जाधवर, रामलिंग जाधवर, वाहतूक निरीक्षक निलेश जाधव, दत्तात्रय इंगोले, माधवसिंग राजपूत यांच्यासह एसटीचे कर्मचारी, चालक-वाहक आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top