कळंब (प्रतिनिधी)-  कळंब बसस्थानकातील पार्सल सेवा मागील चार महिन्यांपासून बंद असल्याने प्रवाशांसह व्यापारी आणि मालवाहतूकदारांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. एसटी महामंडळाच्या बसमधून होणारी पार्सल वाहतूक बंद पडल्याने नागरिकांची अक्षरशः फरफट होत असून, बंद असलेले पार्सल कार्यालय तातडीने सुरू करावे, अशी जोरदार मागणी प्रवासी व व्यापारी वर्गातून होत आहे.

कळंब हे तालुक्याचे प्रमुख व्यापारी केंद्र असून, येथून दररोज विविध ठिकाणी पान, खवा तसेच अन्य व्यावसायिक साहित्याची पार्सलद्वारे वाहतूक केली जाते. मात्र, मागील चार महिन्यांपासून स्थानकातील पार्सल कार्यालय बंद असल्याने या व्यावसायिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. पार्सल बुकिंग करण्यासाठी व्यापाऱ्यांना येरमाळा किंवा धाराशिव येथे जाऊन पावत्या काढाव्या लागत आहेत. यामुळे वेळ, पैसा आणि श्रमाचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, पार्सल कार्यालय बंद असल्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांनाही बसत आहे. पार्सल सेवा उपलब्ध नसल्याने मालाची वाहतूक करताना वाहक आणि प्रवाशांमध्ये अडवणुकीचे प्रसंग निर्माण होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे. अधिकृत पार्सल बुकिंगची सुविधा नसल्याने माल पाठविणे आणि स्वीकारणे दोन्ही कठीण झाले आहे.


वरिष्ठांचा आदेश मिळताच सेवा सुरू करू

याबाबत कळंब आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप यांच्याशी संपर्क साधला असता, वरिष्ठांचा आदेश प्राप्त होताच पार्सल सेवा तात्काळ सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


 
Top