भुम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील ईट गावचे भूमिपुत्र आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (एनआयडी),अहमदाबाद येथील डिझाइन फाउंडेशन स्टडीज विभागाचे ऍक्टिव्हिटी चेअरपर्सन चक्रधर सासवडे यांना प्रतिष्ठेचा 2026 चा आंतरराष्ट्रीय डिझाइन परिषद शिक्षण पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळविणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत.
एनआयडीच्या फाउंडेशन कार्यक्रमाच्या उभारणीत गेल्या 25 वर्षांपासून दिलेले योगदान आणि देशभरातील शाळांमध्ये डिझाइनविषयक साक्षरता पोहोचविण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डिझाइन शिक्षण क्षेत्रात व्यापक आणि सकारात्मक बदल घडविणाऱ्या कार्याचा या पुरस्काराच्या माध्यमातून गौरव केला जातो. स्पेनमधील माद्रिद येथे 7 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय डिझाइन परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सासवडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
1963 मध्ये इकाग्राडा या नावाने स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय डिझाइन परिषद ही कॅनडातील मॉन्ट्रियल येथे मुख्यालय असलेली आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे. डिझाइनच्या माध्यमातून तांत्रिक नवकल्पना आणि सांस्कृतिक विकासाला चालना देण्याचे काम ही संस्था करते. सध्या 58 देशांमधील 114 संस्था या परिषदेच्या सदस्य आहेत. 2006 मध्ये सुरू करण्यात आलेला हा आंतरराष्ट्रीय डिझाइन शिक्षण पुरस्कार डिझाइन शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय नवकल्पना, संशोधन आणि योगदान देणाऱ्या शिक्षक किंवा संशोधकांना प्रदान केला जातो. सासवडे यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे भारतीय डिझाइन शिक्षण क्षेत्राचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. ईटसारख्या छोट्या गावातून जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल ईट गावासह संपूर्ण भूम तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. गावातील नागरिक, नातेवाईक व मित्रपरिवाराकडून चक्रधर सासवडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
