धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील विविध शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन इंटर्नशिप डॉक्टरांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील विविध शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस पूर्ण करून इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांना मिळणारे विद्यावेतन सध्याच्या वाढत्या महागाईच्या तुलनेत अत्यंत अपुरे आहे. निवास, भोजन, प्रवास तसेच दैनंदिन गरजा भागविताना या डॉक्टरांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, इंटर्नशिपच्या काळात हे डॉक्टर रुग्णालयांमध्ये नियमित रुग्णसेवा, आपत्कालीन सेवा आणि विविध वैद्यकीय जबाबदाऱ्या पार पाडत असतात. त्यामुळे त्यांच्या कामाचे स्वरूप आणि जबाबदाऱ्या लक्षात घेता विद्यावेतनात योग्य वाढ होणे आवश्यक असल्याचे आमदार डॉ. पाटील यांनी नमूद केले आहे. तसेच राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये इंटर्नशिप डॉक्टरांसाठी समान विद्यावेतन धोरण लागू करावे, जेणेकरून कोणत्याही महाविद्यालयातील डॉक्टरांवर अन्याय होणार नाही, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
