धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव पालिकेतील उद्यानाची कामे का सुरू केली जात नाहीत? जिल्ह्यातील इतर शहरातील उद्यानाची कामे पूर्ण होत आहेत. कामाची अडवणूक करण्याची भूमिका बंद करा. अशी तक्रार करत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी यांना नगर पालिकेच्या सीओ बाबत कार्यवाही प्रस्तावित करण्याचे निर्देश दिले. 

धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात जिल्हास्तरीय सनियंत्रण व समन्वय (दिशा) समितीची महत्त्वपूर्ण बैठक खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामे, दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या प्रसंगी खासदार राजेनिंबाळकर यांनी रखडलेली कामे मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या आहेत. या बैठकीस आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या सीईओ प्रियंवदा म्हाडदळकर यासह सभापती उपस्थित होते. बैठकीत प्रामुख्याने जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व टंचाई निवारण, पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, शहरी व ग्रामीण पाणीपुरवठा योजना, जलजीवन मिशनची अपूर्ण कामे, धाराशिव शहरातील रखडलेली उद्यान विकासकामे, ग्रामीण व शहरी रस्त्यांची दुरुस्ती, तसेच प्रलंबित पायाभूत सुविधांच्या कामांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नगर परिषदेचे सीओ अंधारे यांना धारेवर धरत कामे का होत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला. कामे करून घेण्याची जबाबदारी तुमची आहे असेही सांगितले. 

यासोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न, पीकविमा व कृषी अनुदान, ग्रामीण आरोग्य सेवा, प्राथमिक आरोग्य केंद्रांतील सुविधा, शाळांमधील मूलभूत सोयी-सुविधा, प्रधानमंत्री आवास योजना, मनरेगा, वीजपुरवठा व कृषीपंपांच्या समस्या, महिला व बालकल्याण योजना, स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन या महत्त्वपूर्ण विषयांकडे संबंधित विभागांचे लक्ष वेधण्यात आले. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या विकासकामांची सद्यस्थिती, निधीची उपलब्धता आणि योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती घेण्यात आली. मंजूर असूनही प्रलंबित असलेली कामे, निधीअभावी रखडलेले प्रकल्प आणि नागरिकांच्या तक्रारी यांचा प्राधान्याने निपटारा करण्याची आवश्यकता यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अधोरेखित केली.  


 
Top