धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्यासह शहरातील कचरा डेपो शहराबाहेर हलविणे, नियमित स्वच्छता करणे, तुंबलेल्या गटारी व नाल्यांची स्वच्छता करणे आणि विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
काँग्रेसच्या वतीने सुरुवातीला तीन दिवस ही मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, नागरिकांच्या आग्रहास्तव रविवारी चौथ्या दिवशीही आठवडी बाजार व शांती निकेतन परिसरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नागरिक, व्यापारी तसेच ग्रामीण भागातून आठवडी बाजारासाठी आलेल्या ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून शहराच्या स्वच्छतेच्या प्रश्नांबाबत आपली भूमिका मांडली. आठवडी बाजार परिसरात स्वच्छता राखण्यात यावी, तेथील दुर्गंधीचे साम्राज्य दूर करण्यात यावे, शहरातील कचरा डेपो तातडीने शहराबाहेर हलविण्यात यावा आणि हलविल्यानंतरही कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेद्वारे मांडल्या.
या मोहिमेला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवार, दि. 24 नोव्हेंबर रोजी धाराशिव नगर परिषदेच्या समोर भव्य जनआंदोलन करण्यात येणार आहे. शहरातील स्वच्छता, कचरा डेपो आणि इतर नागरी समस्यांबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. या स्वाक्षरी मोहिमेत जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर, प्रशांत पाटील, खलील सय्यद, धनंजय राऊत, अग्निवेश शिंदे, जावेद काझी, प्रभाकर लोंढे, पोपट शिंदे, हरिदास शिंदे,मौलाना शौकत, संजय गजधने, जयसिंगराव पवार, प्रेमानंद सपकाळ, अभिमान पेठे, राजुदास आडे,बालाजी राठोड, प्रेमानंद सपकाळ, अविनाश रणखांब,मन्सूर सय्यद, आरिफ मुलानी, बाबा मोमीन,प्रसाद देशमुख यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते,नागरिक सहभागी झाले होते.
