धाराशिव (प्रतिनिधी)- महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत नव तेजस्विनी प्रकल्पांतर्गत मराठवाडा विभागस्तरीय लोक संचलित साधन केंद्र कार्यशाळा दिनांक 19 नोव्हेंबर रोजी अनुराधा मंगल कार्यालय कावलधारा, ता.जि. धाराशिव येथे संपन्न झाली. यावेळी उदघाटक म्हणून किर्ती किरण पुजार जिल्हाधिकारी, धाराशिव व प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेचे प्रास्तविक संदिप मराठे ( विभागीय सल्लागार), यांनी केले.
तसेच यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना जिल्हधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दुष्काळ निवारण उपाययोजना साठी जिल्ह्यात चारा व पाणी नियोजनची माहिती दिली. तसेच कुटुंब व गाव विकासासाठी महिलांचे योगदान कौतुकास्पद असल्याचे सांगितले. त्याच प्रमाणे जास्तीत जास्त महिलांनी शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी माविम च्या महिला बचतगट मार्फत होत असलेल्या 99% बँक कर्ज परतफेडीचे अभिनंदन केले. तसेच बचतगटाचे कर्ज घेऊन चांगले नाविन्यपूर्ण उद्योग व्यवसाय करून त्याची मार्केटिंग करण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले.
या परिसंवाद कार्यशाळेमध्ये विविध विषयावर पॅनल डिस्कशन घेण्यात आले. यामध्ये मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्याच्या लीडर्स महिलांनी भाग घेतला. पॅनल डिस्कशनमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम-सेंद्रिय शेती, दुष्काळ निवारण उपाययोजना, जलसंवर्धन, हवामान बदलाचे परिणाम व उपाययोजना , लोक संचलित साधन केंद्रची सध्यस्थिती व व्हिजन बिल्डिंग, प्रशासकीय व्यवस्थापन व आर्थिक व्यवस्थापन इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा झाली. या पॅनल डिस्कशन समिती चे सदस्य म्हणून प्रा.गणेश चादरे ( तुळजापूर), प्रा.डॉ. संतोष थिटे, बाबुराव पाटील महाविद्यालय, अनगर जिल्हा सोलापूर व वैशाली घुगे (मास्टर ट्रेनर, यशदा) यांची उपस्थिती होती.
या मराठवाडा विभागीय परिसंवाद कार्यशाळेमध्ये सध्यस्थिती व सामाजिक प्रश्नावर अवलंबून ग्रामीण कलाकारांमार्फत जनजागृतीपर कार्यक्रम सादर करण्यात आले. तसेच हायड्रोफोनिक व आझोला चारा युनिट डेमो मांडणी करण्यात आली होती. यावेळी उपस्थित महिलांना कुपोषण निर्मुलनासाठी परसबाग करिता विविध प्रकारचे 21 देशी बियाणे असणारे 550 पॉकेट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी इतर प्रमुख पाहुणे म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) चे राजीव शिंदे, राज्य सल्लागार- माविम, संदिप मराठे- विभागीय सल्लागार, उत्कर्ष भोळे-विभागीय व्यवसाय विकास सल्लागार , मराठवाडा विभागातील विविध जिल्ह्याचे जिल्हा समन्वय अधिकारी सोमनाथ लामगुंडे, सुखदेव चिंचोलीकर, संजय गायकवाड, चंदनसिंग राठोड, विलास जगताप, जया नेमाने, अनंत खेत्रे उपस्थित होते. तसेच मराठवाडा विभागातील 46 लोक संचलित साधन केंद्राचे पदाधिकारी व व्यवस्थापक आणि निवडक सहयोगीनी या कार्यक्रमास उपस्थित होत्या. या परिसंवाद कार्यशाळेचे सूत्रसंचालन सुखदेव चिंचोलीकर, जिल्हा समन्वय अधिकारी, धाराशिव व आभार प्रदर्शन विजयकुमार स्वामी यांनी केले.
