कळंब (प्रतिनिधी)- माणसाने आयुष्यात कितीही पैसा कमावला, संपत्ती निर्माण केली तरी आयुष्याच्या शेवटी त्याची खरी ओळख ही त्याच्या कर्तृत्वातूनच निर्माण होते. त्यामुळे आर्थिक उन्नती साधताना सामाजिक जीवनातही आपले योगदान देणे तितकेच महत्त्वाचे आहे. समाजातील वंचित घटकांसाठी आपल्या कमाईतील काही हिस्सा खर्च करून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, असे प्रतिपादन स्वप्नपूर्ती उद्योग समूहाचे अध्यक्ष विठ्ठल माने यांनी केले.
ते तालुक्यातील हासेगाव (के) येथील पद्मश्री शंकर बापू माध्यमिक विद्यालयात आयोजित माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पद्मश्री शंकर बापू आपेगावकर तसेच नागेश्वर शिक्षण संस्थेचे दिवंगत अध्यक्ष विश्वंभर पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर स्वप्नपूर्ती उद्योग समूहाचे अध्यक्ष विठ्ठल माने, विद्यालयाचे मुख्याध्यापक परमेश्वर पालकर आणि माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष हरिओम भवर उपस्थित होते.
पुढे बोलताना विठ्ठल माने म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या आयुष्यात आर्थिक आणि व्यावहारिक प्रगती साधली पाहिजे. मात्र, आपली जडणघडण करणारे आई-वडील आणि गुरुजन यांचे योगदान कधीही विसरता कामा नये. जीवनात यशस्वी झाल्यानंतर समाजाप्रती असलेले ऋण फेडण्याची जाणीवही प्रत्येकाने ठेवली पाहिजे. माणूस गेल्यानंतर त्याच्याकडे किती पैसा होता, यापेक्षा त्याने समाजासाठी काय केले, किती माणसे जोडली आणि किती जणांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविला, यावरच त्याचे खरे माणूसपण ठरते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील काही वेळ आणि कमाई समाजकार्यासाठी खर्च केली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक परमेश्वर पालकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाबासाहेब दराडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहशिक्षक दत्तात्रय कोल्हे, बाबासाहेब दराडे, अजित हजारे, संतोष कोरे आणि रवी गालफाडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
