कळंब  (प्रतिनिधी) : धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर दुष्काळामुळे निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी नॅचरल शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि., साईनगर रांजणीच्या वतीने शेतकऱ्यांना विविध उपाययोजनांचे पाठबळ देण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थितीत खोडवा ऊस व्यवस्थापन, बेणे मळा संगोपन तसेच पाचट व बगॅसपासून पौष्टिक चारा निर्मिती या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी कारखाना स्थळी विशेष शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

कृषिरत्न डॉ. संजीव माने, पशुआहारतज्ज्ञ डॉ. प्रफुल्लकुमार पाटील आणि नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी.बी. ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. संजीव माने यांनी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी खोडवा ऊस मोडण्याची घाई करू नये, असे आवाहन केले. योग्य नियोजन, शास्त्रीय व्यवस्थापन आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास खोडवा उसातूनही चांगले उत्पादन घेणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. खोडवा ऊस जोपासण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध उपाययोजनांची माहितीही त्यांनी दिली.

पशुआहारतज्ज्ञ डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी पाचट व बगॅसपासून कमी खर्चात उत्कृष्ट मुरघास तयार करण्याचे तंत्र शेतकऱ्यांना समजावून सांगितले. पाचटापासून मुरघास तयार करण्याचे प्रात्यक्षिकही यावेळी सादर करण्यात आले. त्यामुळे दुष्काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाली.


ठिबकसाठी 25 टक्के अनुदान; 65 टक्के कर्जाची सुविधा

यावेळी बोलताना कृषिरत्न बी.बी. ठोंबरे म्हणाले की, नॅचरल शुगर नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी खोडवा ऊस न मोडता त्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करावे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे काळाची गरज आहे. शेतकऱ्यांना नॉन-आयएसआयठिबक सिंचन संच उपलब्ध करून देण्यासाठी कारखान्यामार्फत मदत केली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी केवळ 10 टक्के रक्कम भरायची असून, कारखान्यामार्फत 25 टक्के अनुदान आणि श्री साई पतसंस्थेमार्फत 65 टक्के कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.


खोडव्यासाठी झेंबा खत, जलसंधारणालाही प्राधान्य

दुष्काळी परिस्थितीत खोडवा उसासाठी पाणी धारण करण्याची क्षमता असलेले झेंबा खत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे खत पिकाच्या गरजेनुसार पाण्याचा पुरवठा होण्यास मदत करणार आहे. तसेच कारखान्यात उत्पादित होणारी खतेही ऊस उत्पादकांना उधारीवर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे ठोंबरे यांनी स्पष्ट केले. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कारखान्यामार्फत जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार असून, शेतकऱ्यांसाठी 'जलतारा' योजना 100 टक्के अनुदानावर राबविण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.


जनावरे विकू नका; नॅचरल डेअरी सांभाळणार!

दुष्काळामुळे पशुधन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये, यासाठी ठोंबरे यांनी महत्त्वाचे आवाहन केले. शेतकऱ्यांनी जनावरे कत्तलीसाठी विकू नयेत, तर ती सांभाळावीत. मात्र, काही शेतकऱ्यांना जनावरे सांभाळणे शक्य नसल्यास त्यांनी डेअरीच्या सुपरवायझरकडे नोंदणी करावी. अशा जनावरांच्या संगोपनाची जबाबदारी नॅचरल डेअरीमार्फत घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय पाचटापासून मुरघास तयार करण्यासाठी कारखान्यामार्फत 25 टक्के अनुदान देण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनापासून पशुधन संवर्धनापर्यंत विविध पातळ्यांवर मदत करण्याचा नॅचरल शुगरचा प्रयत्न या मेळाव्यातून अधोरेखित झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कारखान्याचे संचालक कृषिभूषण पांडुरंग आवाड यांनी केले, तर प्रवर्तक श्रीपाद ठोंबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी कारखान्याचे संचालक, प्रवर्तक, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top