परंडा (प्रतिनिधी)- उपजिल्हा रुग्णालय, परंडा येथे आज दि.14 रोजी जागतिक मधुमेह दिन व बालदिनाचे औचित्य साधून आरोग्य जनजागृतीचा विशेष उपक्रम राबविण्यात आला.‘आयुर्वेद, आधुनिक वैद्यकशास्त्र, भारतीय संस्कृती आणि संविधानिक मूल्यांच्या माध्यमातून निरोगी समाजनिर्मितीचा संकल्प' या संदेशावर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ.जुबेर मोमीन यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती कुलकर्णी,डॉ.बोराडे, डॉ.आकाश जाधवर, डॉ.हाश्मी अब्दुल वदूद, डॉ.आनंद मोरे, फार्मसी ऑफिसर जितेंद्र ओव्हाळ, इन्चार्ज सिस्टर सौताडकर, पूनम इंगळे, ब्रदर इमरान शेख, नागनाथ रणखांब, मिलिंद बनसोडे, आशिष, मकरंद वाम्बुरकर तसेच सिक्युरिटी कर्मचारी अक्षय यादव व राजेंद्र उदागे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात मधुमेहाची कारणे, लक्षणे, गुंतागुंत व प्रतिबंधात्मक उपाय यावर तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.‘वारंवार लघवी होणे, खूप तहान लागणे, थकवा व वजन कमी होणे ही मधुमेहाची प्रमुख लक्षणे आहेत. नियमित तपासणी व जीवनशैलीत बदल करून मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते असे डॉ. आनंद मोरे यांनी सांगितले.
बालदिनानिमित्त बालकांचे पोषण, लसीकरण,मैदानी खेळांचे महत्त्व व मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम यावरही चर्चा झाली.आयुर्वेदातील दिनचर्या, ऋतुचर्या व योगाचे महत्त्व विशद करण्यात आले.तसेच भारतीय संविधानातील अनुच्छेद 21 व 47 नुसार ‘आरोग्य हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे' हा संदेश देण्यात आला. ‘प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा म्हणजे प्रतिबंधात्मक न्याय' या संकल्पनेवर भर देत रुग्णालयात मोफत मधुमेह तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.मधुमिया व बाल दिना निमित नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.
