धाराशिव (प्रतिनिधी)-  कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील नीराभीमा जोड बोगदा, जेऊर बोगदा आणि मिरगव्हाण पंपगृह या कामांची आमदार कैलास पाटील यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. धाराशिव आणि बीड जिल्ह्यांना हक्काचे पाणी मिळवून देणाऱ्या या तिन्ही महत्त्वाच्या टप्प्यांवर कामे अपूर्ण असल्याचे, तर दोन्ही बोगद्यांचे काम बंद पडल्याचे या पाहणीत समोर आले. त्यामुळं हक्काचे पाणी मिळणार कसे ? असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केला आहे. 

या पाहणी दौऱ्यात उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सह संपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, शिवाजी सरडे, जि. प. सदस्य सातपुते, प्रवीण कोकाटे, रवी वाघमारे, पंकज पाटील, कार्यकारी अभियंता नाईक, घनवट आदी उपस्थित होते. कृष्णा खोऱ्यातील हक्काचे 7 टीएमसी पाणी मराठवाड्याच्या दुष्काळी भागाला मिळवून देणारा हा प्रकल्प धाराशिव आणि बीड जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नीरा नदीवरील उद्धट बंधाऱ्यातून 7 टीएमसी पाणी 23.68 किमी लांबीच्या नीरा-भीमा बोगद्यामार्गे उजनी जलाशयात आणले जाणार आहे. त्यापैकी 5.32 टीएमसी पाणी करमाळा तालुक्यातील दहिगाव येथून 26.85 किमी लांबीच्या जेऊर बोगद्याद्वारे मिरगव्हाण पंपगृहापर्यंत नेले जाईल. तेथून 3.08 टीएमसी पाणी उपसा करून सीनाकोळेगाव जलाशयात, तर 2.24 टीएमसी पाणी बंद नलिका गुरुत्व वाहिनीद्वारे सीना नदीत सोडले जाईल.


नीराभीमा बोगदा : जून 2023 पासून काम बंद

या बोगद्याचे 23.68 किमीपैकी 20.99 किमी काम पूर्ण झाले असून चार ठिकाणी मिळून 2.69 किमी, म्हणजे सुमारे 11.4 टक्के काम अद्यापही अपूर्ण आहे.

उद्धट बंधाऱ्याच्या बाजूला सुरुवातीचे सुमारे 1.08 किमी ओपनकट आणि त्यापुढील 800 मीटर बोगद्याचे काम बाकी आहे. उजनीच्या बाजूला भादलवाडीजवळ 448 मीटर बोगदा आणि शेवटचे 360 मीटर ओपनकटचे काम बाकी आहे. आर्थिक नियोजनाअभावी ही कामे जून 2023 पासून बंद आहेत. आता काम सुरू केले तरी ते पूर्ण करायला किमान 1ते 2 वर्षे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जेऊर बोगदाचे 27 जुलै 2024 पासून काम बंद असून, या बोगद्याचे 26.85 किमीपैकी 23.97 किमी खोदकाम पूर्ण झाले आहे. सात ठिकाणी मिळून 2.88 किमी, म्हणजे सुमारे 10.72 टक्के खोदकाम बाकी आहे. मिरगव्हाण पंपगृहाचे 40 टक्के काम बाकी आहे. या ठिकाणचे काम संथ गतीने चालू आहे. 


आमदार कैलास पाटील यांची सरकारकडे मागणी

नीरा-भीमा बोगदा पूर्ण झाल्याशिवाय हक्काचे 7 टीएमसी पाणी उजनीत येणार नाही, जेऊर बोगदा पूर्ण झाल्याशिवाय ते मिरगव्हाणपर्यंत पोहोचणार नाही आणि पंपगृह पूर्ण झाल्याशिवाय ते सीनाकोळेगाव जलाशयात पाणी येणार नाही. एकाच साखळीतील हे तिन्ही टप्पे रखडल्याने धाराशिव आणि बीडच्या दुष्काळी भागाला हक्काचे पाणी मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे तातडीने कामे पूर्ण करावीत अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. 

 
Top