धाराशिव (प्रतिनिधी)-  भारतीय संविधान हे केवळ देशाचा कारभार चालविणारे कायद्याचे पुस्तक नसून ते प्रत्येक भारतीय नागरिकाच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा आधारस्तंभ आहे. संविधानाने आपल्याला अधिकार दिले आहेत. मात्र त्या अधिकारांसोबत कर्तव्यांची जाणीव आणि लोकशाही मूल्यांचा आदर राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे भारतात संविधानिक संस्कृती रुजणे आणि ती अधिक व्यापक होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. रवी सुरवसे यांनी केले.

रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागांतर्गत संविधान दिवसानिमित्त आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते प्रा सुरवसे बोलत होते. यावेळी प्रा. सुरवसे पुढे म्हणाले की, संविधानिक संस्कृती म्हणजे केवळ संविधानातील तरतुदींची माहिती असणे नव्हे, तर आपल्या दैनंदिन जीवनात संविधानातील मूल्यांचे आचरण करणे होय. मतभिन्नतेचा आदर करणे, दुसऱ्याच्या अधिकारांची जाणीव ठेवणे, सामाजिक सलोखा जपणे, स्त्री-पुरुष समानता स्वीकारणे आणि कायद्यापुढे सर्व समान आहेत ही भावना मनात रुजविणे, हीच खऱ्या अर्थाने संविधानिक संस्कृती आहे.

कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ ए.के मंजुळकर यांनी केला. प्रास्ताविक डॉ.डी वाय साखरे यांनी केले. तर आभार प्रा डॉ. बालाजी गुंड यांनी मानले. सदर प्रसंगी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top