कळंब (प्रतिनिधी)- राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी महामंडळाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक निर्णय घेतला आहे. महिला प्रवाशांना प्रवास सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या एनसीएमसी कार्डच्या अनिवार्यतेला 31 डिसेंबर 2026 पर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या निर्णयानुसार, 1 ऑक्टोबर 2026 पासून ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना सवलतीचे तिकीट मिळवण्यासाठी  एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, महिला लाभार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेता अद्याप अपेक्षित प्रमाणात कार्डची नोंदणी व वितरण झाले नसल्याचे निदर्शनास आले. विशेषतः ग्रामीण भागातील अनेक महिलांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचली नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने 1 नोव्हेंबर 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत एनसीएमसी कार्डची अनिवार्यता शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत महिला प्रवाशांना कार्डअभावी सवलतीपासून वंचित राहावे लागणार नाही. तसेच 31 डिसेंबरपर्यंत 100 टक्के कार्ड नोंदणी व वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करून महिलांची नोंदणी व कार्ड वितरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, कळंब आगारप्रमुख विजयकुमार घोलप यांनी महिला प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या या सवलतीचा लाभ घ्यावा, तसेच एनसीएमसी कार्ड नोंदणीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन केले आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे दिवाळीच्या काळात प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना दिलासा मिळणार असून, महामंडळाची ही भेट महिला प्रवाशांसाठी आनंददायी ठरणार आहे.

 
Top