कळंब (प्रतिनिधी)-  कर्करोगाचे निदान होताच रुग्णासह संपूर्ण कुटुंबासमोर आरोग्याच्या संकटाबरोबरच आर्थिक संकटही उभे राहते. केमोथेरपी, आधुनिक उपचारपद्धती आणि महागड्या औषधांचा खर्च अनेक कुटुंबांचे आर्थिक कंबरडे मोडणारा ठरतो. मात्र, भारतीय औषधनिर्मिती क्षेत्रातील वाढती क्षमता, स्वदेशी संशोधन आणि जेनेरिक व बायोसिमिलर औषधांची उपलब्धता यामुळे कर्करोगाच्या उपचारांचा खर्च कमी होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडत आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या रुग्णांसाठी आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे.

भारताला जगाची फार्मसी म्हणून ओळखले जाते. मूळ औषधांचे पेटंट संपल्यानंतर त्याच सक्रिय औषधी घटकांवर आधारित जेनेरिक औषधे भारतीय कंपन्यांकडून तुलनेने कमी किमतीत उपलब्ध केली जातात. काही औषधांच्या बाबतीत मूळ औषधांच्या तुलनेत 70 ते 90 टक्क्यांपर्यंत बचत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. परिणामी, पूर्वी लाखो रुपये खर्चून घ्यावी लागणारी काही औषधे आता तुलनेने परवडणाऱ्या दरात मिळू शकतात. औषधनिर्मिती क्षेत्राला चालना देणाऱ्या केंद्र सरकारच्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेमुळे देशांतर्गत औषधनिर्मिती आणि कच्च्या मालाच्या उत्पादनालाही बळ मिळत आहे.

कर्करोग उपचार क्षेत्रात बायोलॉजिकल औषधे आणि मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा वापर वाढत आहे. ही औषधे कर्करोगाच्या पेशींशी संबंधित विशिष्ट जैविक प्रक्रियांना लक्ष्य करतात. मात्र, मूळ बायोलॉजिकल औषधे अत्यंत महागडी असल्याने सर्वसामान्य रुग्णांना ती परवडणे कठीण जाते. यावर उपाय म्हणून भारतीय औषध कंपन्यांनी बायोसिमिलर औषधांच्या निर्मितीत प्रगती केली आहे. जीवनरक्षक औषधे सामान्य नागरिकांच्या आवाक्यात राहावीत, यासाठी राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण  आणि केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. 


कर्करोगाशी लढताना रुग्णाला केवळ आजाराशीच नव्हे, तर औषधोपचारांच्या प्रचंड खर्चाशीही सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत स्वदेशी औषधनिर्मिती, जेनेरिक औषधे, बायोसिमिलर तंत्रज्ञान आणि सरकारी सवलती यामुळे उपचार अधिक परवडणारे करण्याची संधी निर्माण झाली आहे. कर्करोगावरील उपचार आर्थिकदृष्ट्या सक्षम वर्गापुरते मर्यादित न राहता सर्वसामान्य नागरिकांनाही उपलब्ध व्हावेत, हीच या औषधनिर्मिती क्षेत्रातील प्रगतीची खरी कसोटी ठरणार आहे.

-डॉ. हनुमंत गंभीरे ., M.Pharm, PhD

नवी दिल्ली येथील नामांकित फार्मास्युटिकल कंपनीत कार्यरत


 
Top